Nandurbar Rain Update:  नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar Flood) तापी आणि नर्मदा अशा महत्त्वाच्या दोन नद्या वाहतात. पावसाळ्यात या नद्या धोक्याची पातळी ओलांडत असतात. त्यामुळे अनेक गाव नदीकाठावरील असल्याने जीवित आणि वित्तहानी होत असते. त्यासाठी लाखो रुपयांचे आपत्ती व्यवस्थापन साहित्य जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. मात्र तब्बल तीन वर्षांपासून यांचा वापरच न झाल्याने हे साहित्य चक्क एका कुडाच्या खोलीत धूळ खात पडून आहे. विशेष म्हणजे ज्या गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना देखील तीन वर्षांपासून मानधन मिळत नसल्याने त्यांनी देखील आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्यास असमर्थता दर्शवल्याने आपत्ती व्यवस्थापनावरच 'आपत्ती' आली आहे.


राज्यात पाऊस आणि पूर परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी साऱ्याच जिल्हाधिकारी आणि आपत्ती यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. मात्र तापी नदी किनारी असलेल्या प्रकाशामध्ये विदारक चित्र पाहावयास मिळाले आहे. या ठिकाणी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन घेतलेली लाईफ सेव्हिंग जॅकेट, बोटी आणि अत्याधुनिक बोटी चक्क एका खाजगी इसमाच्या कुडाच्या घरात एका अडगळीच्या ठिकाणी धूळ खात पडून असल्याचे दिसून आले. 


याचा वापर कधी झाला याबाबत त्यांना विचारले असता प्रकाशा येथे तीन चार वर्षांपूर्वी कधी तरी याचा वापर झाल्याचे गावकरी सांगतात. खरं तर पूर परिस्थीती पाहता राज्यात आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक घेतली जातात आणि त्याच्या साहित्याची चाचपणी  केली जाते. मात्र नंदुरबारमध्ये अस काहीही पाहावयास मिळाले नसल्याने हे साहित्य काम करतात कि निरुपयोगी याबाबतही साशंकता आहे. स्पीड बोटचे मशीन वर्षभरापासून बंद होते ते दहा दिवसांपूर्वी दुरुस्ती करुन आणून ठेवले मात्र ते चालू आहे कि बंद याबाबत चाचपणीच केलेली नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून खरेदी झालेल्या या साऱ्याच आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्याबाबत प्रशासनाची ही उदासीनता लोकांच्या मुळावरच उठणारी आहे. 


याठिकाणच्या मासेमारी आणि खास पोहण्यात पटाईत असलेल्या 12 जणांच्या टीमला पुण्याला घेऊन जात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.  ही लोक आपत्तीच्या काळात लोकांसाठी जीव वाचवता इथे आत्महत्या करणारे पुराच्या पाण्यात वाहुन येणारे मृतदेहही बाहेर काढण्याचे काम हा बारा जणांचं चमूच करतो. मात्र असे असले तरी तीन वर्षांपासून त्यांना या कामासाठी मानधन मिळालं नसल्याने आपला जीव कशासाठी धोक्यात घालायचा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून होत असलेल्या या दुलर्क्षांमुळेच आता या स्थानिक प्रशिक्षित मच्छिमांरांनी यापुढे आपत्ती व्यवस्थापनाचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात पूरपरिस्थिती आहे. या ठिकाणी गेल्या दोन दिवसात पुराच्या पाण्यात दोन महिलांचा बळी गेला आहे. अशा ठिकाणी प्रशासनाची अशी साधन सामग्री अथवा यंत्रणा दिसलीच नाही. इतक्या लाखो रुपयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या या साहित्याला या गावात एखादे शासकीय कार्यालय उपलब्ध नाही याहून मोठी शोकांतिका नाही. 



इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Mumbai Rains LIVE: मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत,  पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट


Plaghar Rains : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार; वैतरणा नदीच्या पुरात 13 कामगार अडकले, बचावकार्य सुरु


Mumbai Rains : मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द, नवीन तारखा लवकरच जाहीर करणार


Maharashtra Rains :  पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत