Nanded News : शहीद जवान महेंद्र आंबुलगेकर अनंतात विलीन, कर्तव्यावर असताना शहीद, हजारो नागरिकांचा साश्रू नयनांनी निरोप
Nanded News : 'भारत माता की जय, वीर जवान अमर रहे' अशा घोषणा देत शहीद जवान अंबुलगेकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
Nanded News : अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) येथे सीआयएसएफ दलामध्ये (CISF) लष्करी सेवेत असलेले जवान महेंद्र बालाजी आंबुलगेकर (Mahendra Balaji Ambulgekar), वय (32 वर्ष) हे कर्तव्यावर असताना त्यांचे वाहन दरीत कोसळून बुधवारी शहीद झाले. जवान महेंद्र अंबुलगेकर यांचे पार्थिव रविवारी अंबुलगा गावी दाखल झाले. यावेळी 'भारत माता की जय, वीर जवान अमर रहे' अशा घोषणा देत शहीद जवान अंबुलगेकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
कुटुंबियांनी फोडला हंबरडा, नागरिकांचा साश्रू नयनांनी निरोप
शहीद जवान महेंद्र आंबुलगेकर यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणताच अंबुलगेकर कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. रविवारी दुपारी 2 वाजता शहीद जवान आंबुलगेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कंधार शहरातून महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी चौक मार्गे बहाद्दरपुरा फुलवळ येथील नागरिकांनी मानवंदना देवून मुळगावी अंबुलगा येथे आणण्यात आले. विविध फुलांनी, तसेच तिरंगा ध्वजाने सजविलेल्या भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरवात झाली. अंत्ययात्रेत हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.
कुटुंबियांना शोक आवरता आला नाही
महेंद्र आंबुलगेकर यांना अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना 31 जानेवारी रोजी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला, आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. महेंद्र आंबुलगेकर हे अरुणाचल प्रदेशात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये कार्यरत होते, त्यांचे पार्थिव रविवारी त्यांच्या गावी आणण्यात आले, पार्थिव पोहचताच कुटुंबियांना शोक आवरता आला नाही, हजारो नागरिक यावेळी अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते, यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना
अंत्ययात्रा अंबुलगा येथे पोहचल्यानंतर शहीद महेंद्र बालाजी आंबुलगेकर यांच्या पार्थिवास रविवारी तीन वाजता त्यांचा मुलगा तेजस वय 3 वर्षे याने अग्नीडाग दिला. पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ तसेच कुटुंबियांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. शहीद महेंद्र अंबुलगेकर यांना पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना देण्यात आली.
'अमर रहे, अमर रहे'
शहीद महेंद्र अंबुलगेकर यांच्यावर त्यांचे गाव अंबुलगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी नागरिकांकडून 'अमर रहे, अमर रहे' च्या घोषणा देण्यात आल्या
हे ही वाचा>>
मोठी बातमी! एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली, लिलाव होण्याची शक्यता; गिरीश महाजनांची माहिती