नांदेड : कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी कोविड लसीकरण हाच उपाय असल्याचं जरी सिद्ध होत असलं तरी नांदेडकर मात्र लसीकरणासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा कोविड लसीकरणाच्या यादीत तळाला गेल्याचं चित्र आहे. कारण महातष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या लसीकरण टक्केवारीच्या तुलनेत नांदेड 33 व्या स्थानी आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना नोटिस पाठवण्यात आली आहे.


नांदेड जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या लसीकरण क्रमवारीत खालून तिसरा क्रमांक आहे असंच चित्र आहे. राज्यात 16 जानेवारी 2020 पासून कोरोना महामारीवर उपाय म्हणून कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली. 1 मे 2020 पासून जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविड लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या लसीकरणासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लस उपलब्ध झाल्या. लसीकरणाच्या सुरुवातीस या लसी लवकर उपलब्ध होत नसल्याने लसीकरणासाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत होते. तर लसीकरणासाठी नाते-गोते, नातेवाईक, राजकारणी यांची वशिलेबाजी चालत होती. या सर्व प्रकारात लस उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले खरे, मात्र त्यानंतर नागरिकांची लस घेण्याची भावना बळावली नाही.


प्रारंभीच्या टप्यात नागरिकांचा जो उत्साह होता तो उत्साह जवळपास नाहीसाच झालाय. या लसीकरणाला गती मिळवण्यासाठी 75 तास लसीकरण ,स्वस्त धान्य दुकानावर लस असे अनेक फंडे प्रशासनाने लढवले. परंतु त्याला कोणतेही यश मात्र मिळाले नाही.


नांदेड जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास 17 लाख 17 हजार 29 एवढी आहे. पहिल्या डोसची जिल्ह्यातील टक्केवारी 63% एवढी आहे. त्याचप्रमाणे पहिल्या डोसच्या प्रमाणात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या फारच कमी व नगण्य म्हणजे 6 लाख 87 हजार 967 इतकी 


नांदेड महापालिका हद्दीतील लसीकरणाचे प्रमाण केवळ 30 टक्के तर ग्रामीण भागातील लसीकरण टक्केवारी 65 टक्केच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण टक्केवारीत नांदेड महापालिका पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेतील कमी लसीकरण हे  जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीला मारक ठरत आहे. महापालिकेस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने महापालिका क्षेत्रातील लसीकरण धिम्या गतीने होत आहे.


नांदेड जिल्ह्यातील लसीकरणाचे हे प्रमाण कमी असल्या कारणाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन  इटनकर व महापालिका आयुक्त सुनील लहाने यांना कारणे दाखवा नोटिसही बजावल्या आहेत. आता जिल्ह्यातील या लसीकरणाला गती देण्यासाठी 'हर घर दस्तक' या केंद्र शासनाच्या अभियाना अंतर्गत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे आता लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.


संबंधित बातम्या :