कोरोनाबाधित ग्रामस्थ गाव सोडून शेतात आयसोलेट; नांदेडमधील भोसी गावातील नागरिकांचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न महाराष्ट्रासाठी दिशादर्शक
भोसी गावात कोरोनाच्या अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांना सुरुवात झाली. भोसी गावात कोरोनाच्या अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांना सुरुवात झाली. या तपासण्यांमध्ये तब्बल 119 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
नांदेड : भारतात कोरोना व्हायरसच्या प्रसाराला सुरुवात झाल्याने अनेकांना 1896 साली ब्रिटिशांच्या काळातील प्लेगच्या साथीची आठवण झाली असेलच. त्यापुर्वीही साथीच्या रोगाने अनेक वेळा डोके वर काढले होते. त्यावेळी स्वच्छतेचा अभाव, सार्वजनिक आरोग्याची हेळसांड, कुपोषण यामुळे साथ वाढत गेली. तसेच त्यावेळी लोकवस्ती विरळ असल्यामुळे आणि आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्यामुळे लोकांनी प्लेगच्या संसर्गाच्या काळात गावातील आपली घरंदारं सोडून शेतात वास्तव्य केले आणि प्लेग सारख्या साथीतून आपली सुटका करून घेतली. कोरोना व्हायरस हा आजार नवखा असला तरी भारत देशाने प्लेग, पटकी, डेंगी, देवी अशा अनेक आजारांवर मात करताना गावच्या गावं खाली होऊन शेतात वास्तव्यास गेली. हाच प्लेग काळातील शेतात आयसोलेट होण्याचा मार्ग नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने अंगीकृत करून गाव कोरोनामुक्त केलं आहे.
नांदेडपासून 30 कि.मी. अंतरावर आणि सहा हजार लोकवस्तीचे भोसी गाव आहे. साधारण दोन महिन्यापूर्वी या गावात एका लग्न सोहळ्यानंतर मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतरच्या आठवड्यात आणखी पाच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी ग्रामपंचायतीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत भयभीत झालेल्या ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले. आणि गावात जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भोसी गावात कोरोनाच्या अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांना सुरुवात झाली. या तपासण्यांमध्ये तब्बल 119 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तपासणीनंतर बाधित आलेल्यांची तिथूनच शेतात रवानगी करून त्यांना शेतातील वस्तीवरच आयसोलेट करण्यात आले. यासाठी प्रत्येकाच्या शेतात राहण्याची सोय करण्यात आली होती. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांची सोय भोसीकर यांच्या शेतातील 40 बाय 60 आकाराच्या एका शेडमध्ये केली होती. हे सर्व कोरोनाबाधित सुमारे पंधरा दिवस शेतामध्येच राहिले. आरोग्य सेविका, आशा वर्कर दररोज शेतात जाऊन कोरोनाबाधितांशी संवाद साधत होत्या. तसेच गरजेनुसार रुग्णांना जागेवरच औषधे पुरविण्यात आली. दुसरीकडे या बाधितांच्या जेवणाची सोयही शेतामध्येच करण्यात आली होती. त्यामुळे पंधरा दिवसानंतर सर्वच्या सर्व 119 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर दीड महिना उलटून गेला मात्र या गावात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
गावातील नागरिकांची एकाच दिवशी तपासणी करुन सर्व कोरोनाबाधितांची शेतामध्ये रवानगी केली. तेथे त्यांच्या जेवणासह औषध पाण्याची सोय केल्याने गाव कोरोनामुक्त झाले. त्यानंतर कोरोना रोखण्यासाठीच्या मास, सॅनीटायजर,सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचे कटाक्षाने पालन केले जात असल्याने दिड महिन्यापासून गावात एकही रुग्ण आढळलेला नाही. सुरुवातीला कोरोनाच्या तपासण्यांसाठी ग्रामस्थ घाबरत होते. मात्र त्यांचे समुपदेशन केले. तसेच बाधितांवर शेतामध्येच उपचार सुरु करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन औषधे पुरविली. आता गाव कोरोनामुक्त झाले आहे. ग्रामस्थ एकत्रित आलं तर काय चमत्कार घडू शकतो, हे भोसी गावाने दाखिवलं आहे.
कोरोना आजार भयानक आहे. मात्र योग्य उपाययोजना वेळीच केल्यास त्यावर मात करता येवू शकते. हा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. मागील दीड महिन्यापासून गावात एकही रुग्ण नाही. मात्र ग्रामस्थ कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतात.
जुन्या काळात प्लेग सारखे साथीचे आजार आल्यावरग्रामस्थ गाव सोडायचे. त्याप्रमाणे आम्हीही बाधितांना गाव सोडून शेतात पाठविले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. शिवाय बाधितांना शेतातच उपचार दिल्याने ते लवकर कोरोनामुक्त झाले. कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर भोसी गावातील शिवारातील शेतात बाधितांची अशीच शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील भोसी गावचा हा आदर्श कोरोना पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेला तर राज्यातील प्रत्येक गाव कोरोनाच्या विषारी विळख्यातुन मुक्त होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :