Nagpur News : कौटुंबिक कलहातून आईने अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीला छातीशी कवटाळून अंबाझरी तलावात आत्महत्या केली. दोघींचेही मृतदेह तलावातील पाण्यात आढळून आले. ही हृदयद्रावक घटना उघडकीस आल्यानंतर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 2 दिवसांपासून माय-लेकी घरून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने पती रवीच्या फोनवर मेसेज केला होता. उद्या तुला चांगली बातमी मिळणार असल्याचे सांगितले होते.


कल्पना रवी पंडागळे (वय 28) आणि स्वीटी (वय 3) रा. राय टाउन, वैशालीनगर, हिंगणा रोड अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. पंडागळे कुटुंबीय मुळचे मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला येथील रहिवासी आहेत. पती रवी एका खासगी कंपनीत एमआर पदावर कार्यरत आहेत. रवी आणि कल्पना यांचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांनी राय टाऊनमध्ये घर घेतले होते. गेले काही दिवस घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. कल्पनाचे आई-वडीलही एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Nagpur Police) परिसरात राहतात. त्यांचे नेहमीच मुलीकडे जाणे येणे होते. कल्पनाचे वडील मुलीकडे गेले. त्यावेळी दाराला कुलूप होते. शेजाऱ्यांनी कल्पना स्विटी आणि सामानाची बॅग घेऊन बाहेर जाताना दिसल्याची माहिती दिली. वडिलांनी अनेकवेळा फोन केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.


मुलीला घेऊन दिले खाद्यपदार्थ


मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी कल्पना मुलीसह अंबाझरी तलाव परसरात पोहोचली. जवळच्या दुकानातून मुलीसाठी खाद्यपदार्थ घेतले. तेव्हापासून ती तलाव परिसरातच होती. रात्री 10 वाजताच्या सुमारस कल्पनाने स्वीटीला सोबत घेत तलावात उडी घेतली. एका तरुणाने दोघींनाही तलावात उडी घेताला पाहिले. लागलीच त्याने इतरांना माहिती दिली. काही वेळातच अंबाझरी पोलिसांचा ताफा पोहोचला. तातडीने अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. पण, अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली.


दुसऱ्या दिवशी सापडले मृतदेह


जवळच सापडलेल्या बॅगमध्ये कल्पनाने आई-वडील आणि भावाचे नंबर लिहिले होते. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कल्पना आणि स्वीटीचे मृतदेह पाण्यात दिसले. अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढले. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नातेवाईक सासरच्या मंडळींवर आरोप करत आहेत. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.


आत्महत्येपूर्वी पतीला मेसेज


तलाव परिसरात पोहोचल्यानंतर ती तणावात होती. मुलीला घेऊन ती इकडून तिकडे फिरत होती. आत्महत्या करण्यापूर्वी तीने पती रवीच्या फोनवर मेसेज केला होती. उद्या तुला चांगली बातमी मिळणार आहे. शेवटचा मुलीचा चेहरा पाहायचा असेल तर फोन कर, अशी सूचना केली होती. बराच वेळ वाट बघूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तिने तलावात उडी घेतली.


ठाण्यात पोहोचला होता वाद


काही महिन्यांपूर्वी रवीचे आई-वडील नागपुरात मुलाकडे मुक्कामी आले होते. तेव्हा दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. कल्पनाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून रवी आई-वडिलांसोबत आमला येथे निघून गेला होता. तेव्हापासून पतीपत्नीतील वाद टोकाला पोहोचला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'एक राष्ट्र हवेच, पण 'एकच भाषा' नको! संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर भाषणात स्पष्टच बोलले...