Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : राज्यघटनेने हिंदी ही संघराज्याच्या व्यवहारासाठी निवडलेली भाषा आहे. म्हणून महाराष्ट्रात व्यावहारिक भाषा म्हणून मराठीला वगळून हिंदी वापरता येणार नाही. हिंदी ही केवळ एकटी राष्ट्रभाषा नसून देशातील सर्व प्रादेशिक भाषांनाही राष्ट्रभाषांचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे, 'एक राष्ट्र-एक भाषा' ही घोषणा आम्हास मुळीच मान्य नाही. राष्ट्राचे ऐक्य साधायचे असेल तर प्रादेशिक भाषा आणि भाषिक संस्कृतीतून साधा, असे मत 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांतून व्‍यक्‍त केले.


तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या 'सामर्थ्यशाली एकराष्ट्रीयत्त्व निर्माण करण्याचा उद्देश सफल करण्याकरिता प्रादेशिक मातृभाषांची वाढ करणारे साहित्य कसे निर्माण होईल' या वक्तव्याकडे बोट दाखवत चपळगावकर यांनी सर्व प्रादेशिक भाषांत प्रसिद्ध होणारे साहित्य मराठीमध्ये आणि मराठीतील साहित्य सर्व भाषांमध्ये अनुवादित होण्यावर भर दिला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमावादाच्या पार्श्वभूमीवर पाटसकर निवाड्याप्रमाणे दोन भाषिक राज्यांच्या सीमा आखल्या जाव्या, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. 


सरकारसमोर भाषिक दडपशाही रोखण्याचे आव्हान: न्या. नरेंद्र चपळगावकर


भाषावार राज्यरचना निर्दोष होऊच शकत नाही. सीमेच्या दोन्ही बाजूंना काही भाषिक अल्पसंख्यांक राहणारच. मात्र, या भाषिक अल्पसंख्यांकांना आपली भाषा राखण्याचा अधिकार आहे आणि राज्यघटनेचा कलम 350 ख अन्वये त्या तरतूदीचे पालन झालेच पाहिजे. बेळगाव, कारवार, बिदर, विजापूर, निजामाबाद, सोलापूर आदी भागात भाषिक दडपशाही रोखण्याचे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच त्यांनी दररोजच्या व्यवहारात प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या मराठीचा अभिमान बाळगावा, शासनाने साहित्य व्यवहार वाढवावा आणि लेखकांचे स्वातंत्र्य, स्वतंत्र विचारशक्तीची जाणीव नव्या विचारांचा स्विकार करा, वाढती असहिष्णूता बदलते सामाजिक व सांस्कृतिक वास्तव विषयांवर आपली भूमिका संमेलनाध्यक्ष या नात्याने स्पष्ट केली.


...तर लेखकांनी स्वातंत्र्य गमावलं असंच म्हणावे लागेल


माझे लेखनाने लोक नाराज होतील, माझ्या लेखनाने सरकार नाराज होईल, मी असं लिहिले तर लोक मला प्रतिगामी समजतील. असे विचार करून जर लेखक लिहायला लागले. तर त्यांनी स्वातंत्र्य गमावलं असंच म्हणावे लागेल. मात्र एखाद्या वाङ्मयाची निर्मिती बंद पाडणे असे एका शक्तितून होते असे नाही, तर असे अनेक शक्तीतून होत असते, उदाहरण म्हणजे मर्ढेकरांच्या पुस्तक असेही यावेळी अध्यक्षांनी अधोरेखित केले. तसेच साक्षरतेत वाढ झाली असताना साहित्य कृती खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली नाही. नागरिकांना पुस्तके विकत घ्यावी असे का वाटत नाही. अनेक ठिकाणी पुस्तकाचे दुकान सुद्धा नाही, अशी खंतही यावेळी न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केली.


ही बातमी देखील वाचा...


साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा