Jalna News: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या जालना जिल्ह्यातील क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency Coins) प्रकरणी येथील सायबर क्राईम पोलिसांनी अखेर चार संशयिता आरोपींना बेड्या ठोकून, ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या आरोपींच्या ताब्यातून 2 कोटी 44 लाख रुपयांच्या चार अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहे. सोबतच विविध बँकांमधील 3 कोटी 44 लाख रुपये गोठविण्यात आले. विशेष म्हणजे, पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या चारही संशयित आरोपींची नावं जाहीर करण्यात आलेली नाही.
जीडीसीसी या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून जिल्ह्यात 116 लोकांकडून 2 कोटी 69 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात किरण खरात यांच्यासह इतरांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी जिल्ह्यातील शंभराच्यावर लोकांनी सायबर गुन्हे शाखेकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या बाबत सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. या प्रकरणात फसवल्या गेलेल्यांमध्ये माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. यामुळे हे प्रकरण जिल्ह्यासह राज्यात चांगलेच गाजले. या प्रकरणी किरण खरात यांच्यासह इतरांवरही क्रिप्टो करन्सीमध्ये फसवणूक झाल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल झाले आहेत.
गुन्हा दाखल झाल्यावर यातील आरोपी फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, हे आरोपी पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांतील इचलकरंजीसह गुजरातमध्ये असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथक या शहराकडे रवाना करण्यात आले. तर एकाचवेळी या ठिकाणी छापे मारून चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्याकडून 3 लॅपटॉप, संगणक आणि 9 महागडे मोबाईल, सुमारे 2 कोटी 44 लाखांच्या चार आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या.
अलिशान गाड्या ताब्यात
क्रिप्टो करन्सी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींनी बँकेतून पैसे काढू नये, यासाठी त्यांचे बँक खातेही पोलिसांनी गोठविले आहे. सोबतच त्यांच्या ताब्यातून घेण्यात आलेल्या अलिशान गाड्यांत 18 लाखांची निक्सॉन, 94 लाखांची जग्वार, 61 लाखांची स्कोडा, 15 लाखांची थार यांचा समावेश आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये क्रिप्टो करन्सीमधील पुणे येथील म्होरक्यासह इतर चौघांचा समावेश असल्याचे समजते.
यांनी केली कारवाई!
याप्रकरणी कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, आर्थिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलिस उपाधीक्षक बी.डी. फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, संभाजी वडते, पोलिस कर्मचारी फुलसिंग घुसिंगे, महिला पोलिस कर्मचारी मंगला लोणकर, श्रीकुमार आडेप, ज्ञानेश्वर खराडे, सागर बावीस्कर, संभाजी तनपुरे, गोपाल गौसिक, धीरज भोसले यांनी कारवाई केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jalna News: जालन्यातील 'क्रिप्टो' घोटाळ्याची व्याप्ती वाढली, आतापर्यंत 103 तक्रारी दाखल