Nashik Crime : नाशिक शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी नाशिक पोलिसांनी कंबर कसली असून यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विराेधी विशेष पथकाकडून इंदिरानगर भागातील पेरूच्या बागेत राजराेस चालणाऱ्या हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला. त्यामुळे हुक्का पार्लर चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारीसह अवैध धंद्यांना (Illegals Profession)) ऊत आला आहे. अशातच शहरातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांनी विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत गस्त घालण्यात येऊन कारवाई केली जात आहे. अशातच नाशिक शहरातील इंदिरानगर (Indiranagar) भागातील पेरूच्या बागेत (Peru Bag) राजराेस चालणाऱ्या हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांनी धूम्रपानास मनाई असणाऱ्या ठिकाणी अवैधरित्या हुक्का पार्लर चालविणाऱ्या हाॅटेल मालकासह नऊ ग्राहकांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा ते इंदिरानगर भागाला जाेडणाऱ्या भागात हॉटेल 'द पेरू फार्म'वर ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाेल्या माहितीनुसार, याठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह युवक-युवती माेठ्या संख्येनं धुम्रपान करण्याबराेबरच प्रतिबंधीत हुक्का पिण्यासाठी गर्दी करतात. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता हाॅटेलचे व्यवस्थापक नितीन शांताराम आहिरे आणि हाॅटेल मालक शंकर राजाराम पांगरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. विनापरवाना बेकायदा हुक्का बार चालवून, प्रतिबंधीत हुक्का ग्राहकांना सेवनासाठी जागा उपलब्ध करून देऊन हुक्क्याची साधने आणि प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ पुरवले जात होते. तसेच, हॉटेलमध्ये सात इसम हे प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले.
पेरूच्या बागेत हुक्का पार्टी
दरम्यान, या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनगर पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. हुक्का पार्लरवर छापा टाकल्यानंतर हुक्क्याचे वेगवेगळे फ्लेवर, अंमली पदार्थ आणि इतर साहित्य हस्तगत केले आहे. याच हुक्का पार्लर परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी थेट पेरूच्या बागेत धाड टाकून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हॉटेलचे मालक संशयित शंकर राजाराम पांगरे, व्यवस्थापक संशयित नितीन अहिरे यांच्यासह ग्राहक असलेल्यांना बेड्या ठोकत गुन्हा दाखल केला आहे.