Nagpur Weather News : दोन दिवस ढगाळ वातावरणासह कमालीचा गारठा जाणवत आहे. त्यानंतर अचानक थंडीचा कडाका वाढला. पारा निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. अचानक बदलणारे तापमान आरोग्यासाठी घातक ठरले आहे. सर्दी, तापाचे रुग्ण अचानक वाढले आहेत. प्रत्येक घराआड तापाचा रुग्ण दिसून येत आहे. सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर झाला आहे.
 
पावसाळी वातावरणानंतर लगेचच थंडीने जोर धरल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रात्रभर गारठा आणि दिवसभर थंडी यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक बेजार झाले आहेत. हवामान विभागाने थंडी अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे बालकांसह वृद्धांमध्ये आजार आणखीच बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे बघायला मिळत आहे. वाढलेल्या थंडीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 


श्वसनविकाराच्या तक्रारी वाढल्या


वातावरणातील बदलामुळे दमा आणि श्वसनाच्या रुग्णांना अधिकच त्रास जाणवतो आहे. प्रदूषणयुक्त धुके श्वसनविकारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. खवखवीसह घसेदुखीच्या तक्रारीही चांगल्याच वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. थंडी आणि ढगाळ वातावरण आणि प्रदूषणामुळे श्वसन विकाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या वाढीचे संकेत श्वसनरोग तज्ज्ञांनी दिले होते, त्यांचा इशारा आता खरा होताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबतच कोरोनातून बाहेर पडलेल्या नागरिकांनी  काळजी घेण्याचे आवाहन श्वसनरोगतज्ज्ञांनी केले आहे. 


संधिवाताने वाढवल्या वेदना


संधिवात असणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय कठीण असतो. थंडी वाढल्याने सांधेदुखीने डोकेवर काढले आहे. विशेषतः वातरक्त आणि आमवात यासारखे आजार बळावले आहेत. सांधे, मणक्यांमध्ये वेदना, सूज, जळजळ आणि सांधे कडक होणे अशा समस्या उद्भवत असल्याचे दिसते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.


मेडिकल, मेयोमध्येही वाढली रुग्णसंख्या


एकीकडे शहरात थंडीचा जोर वाढला असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय IGGMC (मेयो)च्या ओपीडीमध्येही सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शहराचा एआयक्यू (Air Quality Index) वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे दमा आणि श्वसनाच्या रुग्णांना अधिकच त्रास जाणवतो आहे. प्रदूषणयुक्त धुके श्वसनविकारांसाठी कारणीभूत ठरत आहेत.


ही बातमी देखील वाचा...


विवाहित महिलेशी अश्लिल चॅटिंग ; नामांकित कंपनीच्या सुपरवायझरची पोलिसांसमोरच 'धुलाई'