Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात पोलीस स्टेशन समोरच नागरिकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीची 'धुलाई' केल्याची घटना घडली. याचा व्हिडीओ शहरात चांगलाच व्हायरल झाला आहे. आरोपीचे नाव रघुवेंद्र उपाध्याय असून तो मौदा तालुक्यातील एका नामांकित खाजगी कंपनीचा सुपरवायझर आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपीने तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लिल चॅटिंग केली होती. तसेच संबंधित महिलेला अश्लील हातवारे करुन व्हिडीओ कॉलही केला होता. यातून पिडीता घाबरली. तिने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर दोघा पती-पत्नींनी पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतरही त्याला अटक केली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक बीजेपी कार्यकर्त्यांनी कालपासून पोलीस स्टेशन समोरच आंदोलन सुरू केले होते.
रविवारी सायंकाळी पोलीस आरोपीला अटक करुन पोलीस स्टेशनला आल्यावर पोलिसांच्या तावडीतून आरोपीला खेचून आणत स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. काल संध्याकाळी पोलीस आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनला आल्यावर पोलिसांच्या तावडीतून आरोपीला खेचून भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्याची चांगलीच 'धुलाई' केली आणि त्याचे कपडे फाडले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
अशी घडली घटना
फिर्यादी पती आणि पत्नी काम करत असलेल्या कंपनीमध्येच सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या रघुवेंद्र उपाध्याय याने पीडित महिलेला लग्न करण्याची गळ घातली. मात्र, तिने माझे लग्न झाले असून दोन मुले असल्याचे सांगून नकार दिला. काही दिवस हे प्रकरण बंद होते. मात्र, आरोपीने महिलेसोबत मोबाईलवर बोलणे सुरू केले. रघुवेंद्र तिला व्हिडिओ कॉल करून धमकी देत होता. व्हिडीओ कॉल केला नाही तर तुझ्या पतीला जीवे मारेन म्हणून धमकी देत होता. त्यामुळे तिने घाबरून व्हिडीओ कॉल केला. हा प्रकार त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. हा प्रकार तिने पतीला सांगितला. मात्र, जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दोघेही गप्प बसले. त्यानंतर आरोपीने 30 डिसेंबर 2022 ला अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच 4 जानेवारीला सुद्धा तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. त्यावरुन पोलिसांत तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी करण्यात आली.
अटकेसाठी मांडला होता ठिय्या
आरोपीला अटक करण्यात यावी, याकरिता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तक्रार न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी तसेच आरोपीला अटक होत नाही तोवर हलणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या नातेवाइकांनी घेतली. यामुळे तणावाचे वातावरण होते.
ही बातमी देखील वाचा...