नागपूर : तुमची मुलं तासन् तास हातात मोबाईल घेऊन काय करत बसलेली असतात, हे पाहण्याची गरज आहे. कारण नागपुरात गेमिंगच्या आहारी गेलेल्या तीन किशोरवयीन मुलांनी घर, कुटुंब सर्व काही सोडून थेट मुंबईला पलायन केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने त्यांची मोबाईल लोकेशन पोलिसांना मिळाली आणि त्यांना रेल्वेमधून भुसावळ रेल्वे स्थानकात उतरविण्यात पोलिसांना यश मिळाल्याने तिन्ही मुलं सुखरुप आपल्या घरी पोहोचली आहेत.


"फ्री फायर" नावाच्या ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन तिघांनी घर सोडण्याचे ठरविले होते. दरम्यान, ऑनलाईन गेम खेळताना सोबतच्या खेळाडूंनी त्यांना घर सोडून येण्यास सांगितलं होतं का हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.


कोरोना संकटात गेले अनेक महिने बंद असलेल्या शाळा अजूनही पूर्ण स्वरूपात सुरु झालेल्या नाहीत. त्यातही शिक्षण ऑनलाईन झाल्याने चिमुकल्यांच्या हातात तासन् तास मोबाईल आले आहेत. मात्र, त्या मोबाईलचा नेमका कोणता वापर तुमची मुलं कसा करत आहेत हे तपासण्याची नितांत गरज आहे. नागपुरातील राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी तीन किशोरवयीन मुले ( 15 ते 16 वयोगटातील ) शनिवारी पहाटे मॉर्निंग वॉक करायला जातो असं सांगून घरातून गेली आणि अनेक तास परतलीच नाहीत. पहाटे निघालेली मुलं 10 वाजेपर्यंत न परतल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी एकाच परिसरातील तीन मुलं एकाच वेळेस बेपत्ता झाल्यामुळे गांभीर्याने तपास सुरु केला.


Nagpur Corona Update: नागपूर शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये


सीसीटीव्हीमध्ये तिन्ही मुलं रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाताना दिसली. त्यामुळे रेल्वे स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. तेव्हा तिन्ही मुलं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसताना दिसली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधला. शिवाय रेल्वे पोलिसांनाही रेल्वेत झडती घेण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर तिन्ही मुलांना भुसावळमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूर पोलिसांच्या पथकाने तिघांना नागपुरात सुखरूप परत आणलं.


नागपूरातून पलायन करणारी ही तिन्ही मुलं काही दिवसांपूर्वीपर्यंत एकमेकांना ओळखत नव्हती. गेमिंगच्या नादातच तिघांची एकमेकांशी ऑनलाईन ओळख झाली होती. त्यानंतर तिघांनी नागपुरात एकत्रित येत घरातून निघून जाण्याचा बेत का आखला, तिघांना ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आणखी कोणी स्वतःकडे येण्यास प्रवृत्त करत होतं का हे अजून गुलदस्त्यात आहे.


पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात तिन्ही मुले गेमिंगच्या माध्यमातून कोलकात्यातील इतर काही तरुणाच्या संपर्कात होती. मात्र, ते कोलकात्याऐवजी मुंबईत का गेले, ते कोलकात्याला जाण्याऐवजी चुकून मुंबईच्या रेल्वेत बसले का, हे अजून स्पष्ट झालेले नाही ( मुलं सध्या घाबरलेली असल्यानं पोलिसांनी जास्त विचारणा केलेली नाही ) दरम्यान, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते पौगंडावस्थेतील मुलं अचानक अशी घर, कुटुंब सर्व काही सोडून जाणे धोकादायक अवस्था आहे. गेमिंगच्या आहारी गेल्यामुळे या मुलांच्या डोक्यात काही तरी घालमेल सुरु असेल. त्याच वेळी जर घरात योग्य संवाद नसेल तर या वयातील मुले आपली ओळख बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. शिवाय या वयात अनेक मुलांना खऱ्या जगाऐवजी व्हर्चुअल जग खरे वाटू लागते, त्याचेच हे परिणाम असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निखिल पांडे यांचे म्हणणारे आहे.


गेमिंगची दहशत


काही महिन्यांपूर्वी "पब जी" या गेममुळे अनेक मुले आक्रमक होऊन टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या अनेक घटना समोर यायच्या. अनेक मुलंतर गेमिंगच्या आहारी जाऊन गुन्हे करायला ही मागे पुढे बघत नाही अशा घटना ही समोर आल्या आहेत. "फ्री फायर" या गेममुळे बिहार मधील गोपालगंजमध्ये एका मुलाच्या हत्येची घटना ही घडली होती. त्यामुळे "पब जी" नंतर आता सरकारने "फ्री फायर" या गेमवर बंदी घालावी अशी मागणी होऊ लागली आहे.