नागपूर : शहरात कोरोना संक्रमणाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. काल (गुरुवारी) नागपूर जिल्ह्यात तब्बल 500 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी फक्त नागपूर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 445 एवढा होता. त्यामुळे नागपूर महानगरपालिका खडबडून जागी झाली आहे. आज महापालिका आयुक्त यांनी नागपूरकरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देतानाच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत वाढत असलेल्या बेफिकरी बदद्ल चिंता व्यक्त केली.
कोरोना संसर्ग कमी झाल्याचं समजून अनेकजण मास्कचा वापर करताना दिसत नाही. नागपुरात फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. शहरात अचानक कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता महापालिकेने शहरातील 8 ठिकाण निश्चित केले आहे, जिथे कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता ते परिसर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट होऊ शकतात, असे महापालिकेने म्हटलं आहे. नागपूर शहरातील खामला, जयताळा, स्वावलंबीनगर, अयोध्यानगर, न्यू बीडी पेठ, वाठोडा, जरीपटका, जाफरनगर येथे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे लक्षात आल्याची माहिती मनपाचे आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिली आहे. तसेच फ्लॅट स्कीम असलेल्या इमारती आणि गृहनिर्माण सोसायटीमध्ये कुणीही कोरोना बाधित आढळल्यास तिथल्या सर्व रहिवाशांनी तातडीने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
कोरोना बाबतीत विदर्भात अजूनही परिस्थिती गंभीर! रुग्णांची आकडेवारी चिंताजनक
या सूचना सोसायटीने न पाळल्यास तिथल्या लोकांना आयसोलेट करावे लागेल असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. महत्वाचं म्हणजे 1 फेब्रवारीला नागपुरात 218 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते आणि केवळ बारा दिवसात हा दैनंदिन कोरोना बाधितांचा आकडा 500 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता प्रशासनानेही पुन्हा एकदा खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या असून नागरिकांनी सुरक्षेच्या उपायांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. उपराजधानीत आजपर्यंत एकूण 1 लाख 37 हजार 498 जण कोरोनाबाधित झाले आहे. तर आजपर्यंत कोरोनामुळे नागपुरात 4 हजार 215 जणांचा बळी गेला आहे.
#Corona गेल्या 24 तासात साडेतीन हजार नवीन कोरोनाबाधित, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क