मुंबई : जगभरात कोरोनामुळं अनेकांचे जीव आतापर्यंत गेले आहेत. यात कोरोना योद्ध्यांसह लाखो लोकांचा बळी गेला आहे. परिस्थिती इतकी भयानक होती की लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तिच्या अंत्यसंस्काराला देखील जाता आलं नाही. कोरोनामुळं बळी गेलेल्या याच कोविड योद्ध्यांच्या स्मरणार्थ आता एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आपण कोरोनामुळं जीव गेलेल्या आपल्या माणसांना श्रद्धांजली वाहू शकणार आहोत, तसेच त्यांच्या आठवणी अजरामर करु शकणार आहोत. https://www.nationalcovidmemorial.in या वेबसाईटद्वारे योद्ध्याचं चिरंतन डिजिटल स्मारक होणार आहे. राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी याबाबत माहिती दिली आहे.


यासंदर्भात ओक म्हणाले की, मार्च महिन्यापासून आपण सर्वजण कोविडची लढाई लढत आहोत. ही लढाई लढताना आपण अनेक जीव गमावले आहेत. आपले नातेवाईक गमावले आहेत. अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आदींसह अनेक सामान्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आपल्या जवळच्या अनेकांच्या अंतिम यात्रेलाही आपल्याला जाता आलं नाही. याची सल मागे राहिलेल्यांच्या मनात आहे. हे शल्य इतकं मोठं आहे की ते सहन करणं शक्य नाही, असं ओक म्हणाले.


ओक म्हणाले की, हे दुख बोलून व्यक्तही करता येत नाही. आपली जगरहाटी पुढे चालू आहे. हे लक्षात घेऊन काही डॉक्टर्स, पत्रकार एकत्र आलो आणि एक सोशल वेबसाईट तयार केली. नॅशनल कोविड मेमोरियल अशी ही वेबसाईट आहे. यामागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. प्रातांची, राज्यांची, सीमांची बंधनं नाही. या वेबसाईटवर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. कायदेशीर बाबींनी योग्य असणं हे गरजेचं आहे. या वेबसाईटवर आपण कोरोनामुळं आपल्या जवळच्या गमावलेल्या व्यक्तिची माहिती, कार्य, आठवणी, फोटो शेअर करु शकता. हे सर्व मोफत आहे, यासाठी कुठलीही फी नाही, असं ओक यांनी सांगितलं.


या उपक्रमासाठी भारताच्या सर्व राज्यातून अनेक डॉक्टर्स जोडलेले आहेत. माझ्याबरोबर डॉ. समित शाहा, डॉ. राहुल पंडित, कोलकात्याहून डॉ. अभिजित चौधरी आहे. चेन्नईतून डॉ राव आहेत. यांच्यासोबत अनेक महत्वाचे लोक या उपक्रमाशी जोडलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं. या उपक्रमातून आपण आपल्या माणसांना श्रद्धांजली वाहू शकतो. आपण या माध्यमातून आपल्या जवळच्या आणि कोरोनामुळं गेलेल्या लोकांना अजरामर करण्यासाठी वाटा उचलूयात, असंही डॉ. ओक म्हणाले.