Nagpur News नागपूर : जंगल सफारीत आपण जिप्सी किंवा हत्तीवर बसून जंगलात फेरफटका मारतो. मात्र आता लवकरच बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे. भारतातील पहिल्या "बोट जंगल सफारी" ची (First Boat Jungle Safari) नागपूरातील पेंच व्याघ्र प्रकल्पात (Pench Tiger Reserve) जून महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. या बोट जंगल सफारीच्या माध्यमातून वन्यप्रेमी आणि पर्यटकांना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानगवे आणि  इतर वन्य प्राण्यांचे निरीक्षण करता येणार. तसेच पाण्यातील मासे, मगरी आणि नदीच्या अवतीभवतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या हजारो पक्ष्यांचे निरीक्षणही करता येणार आहे.


ही बोट जंगल सफारी 23 किलोमीटरची असून त्यासाठी अडीच तासांचा कालावधी लागणार आहे. सर्वात खास बाब म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पातील ज्या भागातून ही बोट जंगल सफारी सुरू होणार आहे, त्या भागातील जंगलात तब्बल वीस वाघांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वाघ प्रेमींसाठी ही बोट जंगल सफारी वेगळी पर्वणी ठरणार आहे. 


कशी असेल बोट जंगल सफारी?


पेंच व्याघ्र प्रकल्पातील या बोट जंगल सफारीमुळे  जंगलाची शांतता भंग होणार नाही. तसेच कुठलेही ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होणार नाही, यासाठी खास सोलर बोट वापरली जाणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम विभागात चोरबाहुली ते नागलवाडी रेंज दरम्यान बोटीतून ही जंगल सफारी करता येईल. त्याचे अंतर हे  23 किमी राहणार असून बोटीतून ही सफारी अडीच तासात पूर्ण करता येणार आहे. ज्या भागातून ही बोट जंगल सफारी होईल, त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या जंगलात सुमारे वीस वाघ असून हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात बोटीतील पर्यटकांना त्यांची हमखास दर्शन होईल, अशी अपेक्षा आहे. शिवाय अनेक पशू-पक्षी वन्यजीवसह निसर्गाची मनसोक्त आणि आल्हाददायक वातावरण देखील अनुभवता येणार आहे. 


देशातील पहिला तर आशियातील पाचवा डार्क स्काय पार्क


नागपूरातील पेंच व्याघ्र प्रकल्प आता आंतरराष्ट्रीय डार्क स्काय पार्क झाला आहे. विशेष म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पातील डार्क स्काय पार्क भारतातील पहिली आणि आशिया खंडातील पाचवी "डार्कस्काय सेंचुरी" ठरली आहे. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प आता वन्यप्रेमींसह खगोल प्रेमींसाठी आकर्षणाचा खास केंद्र बनणार आहे. मुळातच जंगलात रात्रीच्या वेळेला अंधार असतो. परिसरातील मानवी वस्तीतील कृत्रिम प्रकाश म्हणजेच, विजेचे दिवे, लाइट्स वगळता अनेक किलोमीटरपर्यंत कुठलाही कृत्रिम प्रकाश नसतो. त्यामुळे अशा भागातून खगोलीय, आकाशीय ग्रह, ताऱ्यांचा अवलोकन चांगल्यारित्या करता येतो. जंगल क्षेत्रातील याच नैसर्गिक अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी खगोल प्रेमींसाठी डार्क स्काय पार्क उभारला जातोय.


इतर महत्वाच्या बातम्या