बारामती: यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत ही सर्वाधिक प्रतिष्ठेची झाली. या लढतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर विजय मिळवला. बारामतीमधील (Baramati Lok Sabha) या विजयानंतर एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि लोकसभेच्या निकालानंतर बारामतीच्या वातावरणात मोठा फरक दिसून येत आहे. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये व्यापारी महासंघाने शरद पवार (Sharad Pawar) यांचा मेळावा घेण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यासाठी काही थातुरमातूर कारणे देण्यात आली होती. मात्र, आता बारामती जिंकल्यानंतर त्याच शरद पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये पायघड्या घालण्यात आल्या आहेत.


शरद पवार हे मंगळवारी बारामतीत येणार आहेत. शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या काळात शरद पवार लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. याशिवाय, बारामतीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी बारामतीध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी परिसंवाद पार पडणार आहे. या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण मार्च महिन्यात बारामतीमध्ये व्यापारी महासंघाने शरद पवार यांचा मेळावा घेण्यास नकार दिला होता. यामागे अजित पवार यांच्याकडून येणार दबाव कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आज शरद पवार त्या अनुषंगाने व्यापारी मेळाव्यात काही भाष्य करणार का, हे पाहावे लागेल. 


नेमकं काय घडलं होतं?


एप्रिल महिन्यात बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु होती. त्यावेळी अजितदादा गट आणि शरद पवार गटाकडून बारामतीमधील विविध संस्था आणि कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. बारामतीमधील व्यापाऱ्यांची भूमिका ही निर्णायक ठरणार असल्याने अजित पवार यांनी व्यापाऱ्यांचा एक मेळावा घेतला होता. अजितदादांच्या या मेळाव्यानंतर शरद पवार यांनी बारामतीच्या व्यापारी महासंघाकडे असाच मेळावा आयोजित करण्याची विनंती केली होती. मात्र, व्यापारी महासंघाने त्याला नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता.


शरद पवार यांनी स्वत: याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.  मला बारामतीमध्ये व्यापारी मेळावा घ्यायचा होता. हा मेळावा घेणे शक्य नसल्याचे व्यापारी महासंघाकडून मला कळवण्यात आले. गेल्या 50 वर्षांमध्ये असे कधीच घडले नव्हते, अशी खंत शरद पवार यांनी बोलून दाखवली होती. यानंतर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी खडबडून जागे झाले होते आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते.  आम्ही शरद पवार साहेबांचा मेळावा घ्यायला तयार आहोत. फक्त व्यापारी मेळाव्याच्या वेळेबाबत मिसकम्युनिकेशन झाले. पण आम्ही लवकरच पवार साहेबांची वेळ घेऊन मेळावा पार पाडणार असल्याचे व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले होते.


आणखी वाचा


शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेत मोठं काम, मी कृतज्ञता व्यक्त करतो, महायुतीत असलो तरी विचारधारा सोडणार नाही; अजितदादा भावूक