मुंबई: केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला अवघे एक राज्यमंत्रीपद आले. यावरुन शिंदे गटात (Shinde Camp) प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी (Shivsena MLAs) निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली. यापूर्वी महाविकास आघाडी (MVA) सरकारमधून बाहेर पडताना शिंदे गटाच्या आमदारांनी निधीवाटपात दुजाभाव असल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी बोलून अटी शिथील करण्यासंदर्भात चर्चा करु, असे आश्वासन शिवसेनेच्या आमदारांना दिले.
वर्षा बंगल्यावरही या बैठकीत निवडणुकीच्या बैठकीची समीक्षा करण्यात आली. ही बैठक सुमारे अडीच तास चालली. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) ज्या मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली नाही त्या आमदारांना समज मुख्यमंत्र्यांना दिली. लोकसभा निवडणुकीत उशीरापर्यंत उमेदवार जाहीर झाले नाही, त्यावर चर्चा झाली आणि विधानसभा निवडणुकीत लवकर उमेदवार जाहीर करूयात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीला शिवसेनेचे तीन आमदार गैरहजर होते. यापैकी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील सध्या रुग्णालयात आहेत. तर अन्य दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनुपस्थितीची कल्पना दिली होती.
मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा, शिंदे गटाच्या आमदारांची मागणी
केंद्रीय मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिंदे गटाला आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचे (Maharashtra Cabinet Expansion) वेध लागले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार लवकर करावा, अशी मागणी काही आमदारांनी केली. यावेळी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून लवकरच विस्तार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक पातळीवर काही मतदारसंघांमध्ये युतीचे नेते, पदाधिकारी सहकार्य करत नाहीत, अशी तक्रार देखील शिवसेनेच्या आमदारांनी बैठकीत केली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत काम न केल्याचे आमदारांनी सांगितले. यावर लवकरच महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होईल यामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिले.
आणखी वाचा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का नाही? श्रीरंग बारणे म्हणतात...