Nagpur News नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प (Pench Tiger Reserve) राज्यातील पहिला प्लास्टिक मुक्त (Plastic Free) व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य झाले आहे. पर्यटकांकडून जंगलात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि खास करून प्लास्टिक बॉटल्समुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पर्यटकांच्या प्लास्टिक बॉटल्सवर पेंच मध्ये पूर्णपणे बंदी घातली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रत्येक दारावर रोज शेकडोच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकाकडून त्यांच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स (Plastic Bottle) काढून घेतल्या जातात आणि पेंचच्या व्यवस्थापनाकडून काचेच्या बॉटल्समध्ये शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.


विशेष म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रत्येक गेटच्या जवळ पर्यटकांना मुबलक शुद्ध आणि थंड पाणी काचेचे बॉटल्स मध्ये देण्यासाठी छोटे कारखाने स्थापन करण्यात आले आहे. या छोट्या कारखान्यांमुळे स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगाराची संधीही मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पर्यटकांना गारेगार आणि शुद्ध पाणी प्यायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमामुळे जंगलात होणाऱ्या प्लास्टिकच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे.


राज्यातील पहिला प्लास्टिक मुक्त व्याघ्र प्रकल्प


देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या नागपूर शहराच्या (Nagpur City) परिघात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे त्याप्रमाणे अनेक व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve) देखील आहेत. त्यामुळं वर्षाकाठी लाखो पर्यटक या व्याघ्र प्रकल्पांना भेट देत असून दिवसेंदिवस भेट देणाऱ्या या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ताडोबा, मेळघाट, कान्हा, पेंच इत्यादी सारख्या प्रख्यात व्याघ्र प्रकल्प म्हणजे वन्यजीव प्रेमींसाठी व्याघ्र दर्शनाचे नंदनवनच आहे. मात्र, संपर्ण जगात भेडसावणारी प्रदूषणाची समस्या आता जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांना देखील निर्माण झाली आहे.


गेल्या काही महिन्यांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रात (Nimdhela Buffer Area) एक वाघिण तोंडात प्लास्टिकची बाटली (Plastic Bottle) पाण्यातून बाहेर काढतानाचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर वायरल झाला होता.


उपक्रमाचे वन्यजीव प्रेमी आणि निसर्गप्रेमींकडून स्वागत


विशेष म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं प्लास्टिक आणि कचरामुक्त व्याघ्र प्रकल्प ठेवण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. असं असलं तरी, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ताडोबाकडे पर्यटकांचा ओघ पाहता या व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिकच्या बाटल्या नियमित आढळत आहेत. आता या बाटल्या चक्क वाघांच्या तोंडात दिसून येत असल्यानं त्यांच्या आरोग्याचा आणि संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी ओरड वन्यजीवप्रेमीकडून व्यक्त करण्यात आली होती. परिणामी, या प्लास्टिकचा व्याघ्र प्रकल्पांना बसणारा विळखा लक्षात घेता आता पेंच व्याघ्र प्रकल्पाने महत्वाचे पाऊल टाकले आहे. या उपक्रमाचे वन्यजीव प्रेमी आणि निसर्गप्रेमींकडून स्वागत होताना दिसत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या