नागपूरः गंगा जमुनात येणाऱ्या ग्राहकांना दोन पोलिस कॉन्स्टेबलने मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वारांगना व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
पोलिसांनी वारांगनासंदर्भात संवेदनशीलतेने वागण्याचे तसेच त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याचे आवाहन न्यायालयाने केले होते. परंतु नागपूर पोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे. दहा महिन्यांअगोदर गंगा-जमुना वस्तीला छावणीचे स्वरुप आले होते. वारांगनांच्या घरासमोर नोटीसा लावल्यामुळे हजारो वारांगनांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला होता. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने वारांगनांना सन्मानाने व्हवहाराचा मुलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केल्यावर वारांगनांनी गंगा जमुनात आनंदोत्सव साजरा केला होता. वस्तीत काही व्यक्ती फिरकताच गंगा जमुना वस्तीत तैनात असलेल्या पोलिसांनी या ग्राहकांना दंडुके मारून त्यांना हुसकावून लावले होते. हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. यामुळे वारांगनांमध्ये तीव्र रोष उसळला आहे. वारांगनांना आता तरी महिला समजून सन्मानाची वागणूक द्या, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यां ज्वाला धोटे यांनी मांडली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, मारहाण करणाऱ्या दोन पोलिसांची ओळख पटली असून त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत. आपण संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलिस उपायुक्तांना व्हिडीओ पाहण्याची व दाव्याची पडताळणी करण्यासदेखील सांगितले आहे. अशा प्रकारे गैरवर्तन होत असेल तर ते मानवी हक्कांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचेही ते म्हणाले.
वाचा संतापजनक! नागपुरात विकृत तरुणाचं सहा चिमुकल्यांसोबत अनैसर्गिक कृत्य
ग्राहक की हुज्जत घालणारे?
लकडगंज पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या वस्तीतील प्रकाराबद्दल ठाण्यातील अधिकाऱ्यांना विचारले असता कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. संबंधीत व्यक्ती परिसरातील ग्राहक नसून हुज्जत घालत अरेरावी करत असल्यानेच तैनात पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले होते. यासाठी जर पोलिसांवर कारवाई होत असेल तर पोलिसांचे मनोबलावर परिणाम होईल अशी चर्चा पोलिस वर्तुळात होती.