Maharashtra Sangli Crime News : बोगस बियाणं बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोदामावर सांगलीतील कृषी विभागाच्या पथकानं धाड टाकली आहे. कृषी विभागानं इस्लामपूर येथे छापा मारून 23 लाख 50 हजाराचं सोयाबीन बियाणं जप्त केलं आहे. गरूड सिडस् या नावानं 25 किलोच्या पिशवीतून हे बियाणं सिलबंद करण्यात येत होतं. या प्रकरणी कंपनी मालक प्रणव हसबनीस यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पेरणी हंगामात बियाणं, खतं विक्री करून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं पथक नियुक्त केली आहेत. या पथकानं इस्लामपूरमध्ये गरूड सिडस् या बिजोत्पादक कंपनीच्या गोदामावर मंगळवारी छापा मारला. यावेळी सोयाबीनच्या केडीए 726 जातीच्या बियाणाची 25 किलोच्या पिशवीमध्ये भरणी सुरू होती. यावेळी तिथे हजर असलेल्या गोदाम मालकाकडे बिजोत्पादन परवाना, प्रमाणीकरण आहे का? अशी विचारणा केली आहे. यापैकी कागदपत्रं उपलब्ध होऊ शकली नाहीत.  


बिजोत्पदनासाठी खरेदी केलेल्या सोयाबीनच्या खरेदी पावत्याही नव्हत्या. यामुळे हे बियाणं बोगस असल्याच्या संशयावरून जप्त करून सील करण्यात आलं. या गोदामात प्रति 25 किलोच्या 523 पिशव्या मिळाल्या असून त्याचं बाजार मूल्य 23 लाख 53 हजार 500 रूपये आहे. यातील बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. या प्रकरणी प्रणव गोविंद हसबनीस यांच्याविरूद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी संजय बुवा यांनी तक्रार दिली आहे. या कारवाईमध्ये बुवा यांच्यासह तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने, तंत्र अधिकारी बंडा कुंभार, सुरेंद्र पाटील, स्वप्नील माने यांचा समावेश होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :