Maharashtra Nagpur Crime News : नागपुरात (Nagpur) एका विकृत आरोपीनं सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गेले अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे एका मुलाला शारीरिक त्रास होऊ लागल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलांसोबत हा किळसवाणा प्रकार केलेल्या आरोपीचं नाव मयूर खोडके असून तो 28 वर्षांचा आहे.
आरोपी नागपुरातील वनसंतराव नाईक वस्तीतील लहान मुलांना आंबे आणि चिंच तोडून देण्याचं आमिष दाखवून त्यांना महाराज बाग परिसरात घेऊन जायचा. तिथे एका पडक्या घरांत त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मयूर खोडकेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षांचा मयूर खोडके हा धरमपेठ भागात राहतो. गेले काही आठवडे तो सातत्यानं वसंतराव नाईक वस्तीत जात होता. सध्या लहान मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्यानं आरोपी मयूर झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांसोबत खेळायचा. लहानग्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मयूर त्यांना आपला मोबाईल वापरण्यासाठी द्यायचा. शिवाय तो जवळच असलेल्या महाराजबाग परिसरात आंबे आणि चिंच तोडण्यासाठी घेऊन जात होता. याचवेळी आरोपी लहान मुलांना आंबे, चिंच देण्याचं आमिष दाखवून एका पडक्या घरात नेऊन त्यांच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करत होता.
लहान मुलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मयूरचे हे कृत्य गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होतं. मुलांशी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर आरोपी त्यांना मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे आरोपीच्या भीतीपोटी आणि आंबे-चिंचांच्या आमिषापायी कोणत्याही मुलानं घटनेची वाच्यता केली नाही. तीन दिवसांपूर्वी आरोपी मयूरनं एका नऊ वर्षाच्या चिमुकल्याचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर त्या मुलाला शारीरिक त्रास होऊ लागला. मुलाच्या वेदना पाहून त्या मुलाच्या वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा या घाणेरड्या प्रकारची माहिती त्यांना समजली. त्यांनी वस्तीतील इतर मुलांच्या पालकांशी चर्चा केली. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना विवचारलं असता इतर सहा मुलांसोबत मयूरनं असंच कृत्य केल्याचं समोर आलं. त्यानंतर एका पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात मयूरच्या विरोधात आयपीसीच्या कलम 377 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत मयूर खोडकेला अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :