नागपूर : एकीकडे सर्वसामान्य माणूस जमिनीचे वाद मिटवण्यासाठी किंवा आपली जमीन कुणी हडपली असेल, तर ती परत मिळवण्यासाठी पोलिसांकडे जातो. मात्र पोलिसांचीच जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असेल तर? नागपुरात असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे.
नक्षलवादविरोधी पथक प्रशिक्षण केंद्रावर नागपूर पोलिसांनी डल्ला मारल्याचा आरोप होत आहे. अत्यंत संवेदनशील आणि मौल्यवान 10 एकर जमिन चक्क पोलिसांनीच हडपल्याचा दावा केला जात आहे. मोठ्या पाठपुराव्यानंतर खाजगी उद्योजकासह 6 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरच्या सूराबर्डीत महाराष्ट्र पोलिसांचं नक्षलविरोधी अभियान प्रशिक्षण केंद्र आहे. टेकडीच्या दुसऱ्या बाजूला खाजगी उद्योजक ब्रिजकिशोर अग्रवालचं आलिशान क्लब हाऊस आहे. याच क्लब हाऊसच्या नावाखाली अग्रवालने प्रशिक्षण केंद्राची 10 एकर जमीन हडपल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यात महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांचाही हात असल्याची माहिती आहे.
2008 पासून जमीन हडपण्याचं हे कट-कारस्थान सुरु होतं. जानेवारी 2010 मध्ये तत्कालीन तलाठ्याच्या मदतीनं अग्रवालने सातबारावर नाव आणलं. नक्षलविरोधी प्रशिक्षण केंद्राच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करत महसूल अधिकाऱ्यांनी 2010 मध्ये जमिनीचा फेरफार अग्रवालच्या नावावर करुन दिला.
यानंतर अत्यंत संवेदनशील 10 एकर जमीन कागदोपत्री अग्रवाल यांच्या नावावर झाली. अखेर मोठ्या पाठपुराव्यानंतर अग्रवालसह 6 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणी अजून कुणालाही अटक झालेली नाही. गरजेप्रमाणे कारवाईची भाषा पोलिस बोलू लागले आहेत. मात्र इतके दिवस पोलिस खात्यानं डोळ्यावर कातडं ओढलं होतं का? अशा अनेक प्रश्नांना पोलिसांना उत्तर देणं भाग पडणार आहे.
इतकी संवेदनशील जमिनही अशाप्रकारे अधिकाऱ्याच्या प्राभावाखाली लाटली जात असेल तर तुमच्या-आमच्या जमिनींची गत न विचारलेलीच बरी.