पुणे : वाढत्या गुन्हेगारीमुळे सतत चर्चेत असलेल्या नागपुरात सामान्य जनता ज्यांच्या भरवशावर सुरक्षित राहण्याची अपेक्षा करते, त्याच पोलिसांचा धक्कादायक चेहरा समोर आला आहे. गुंडांना जरब बसवण्याऐवजी पोलिसच गुंडांच्या टोळक्यात घुसून तोडफोड करत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.


नागपुरातील खरबी भागात शनिवारी (17 मार्च) रात्री मनोज घोडे नावाचा पोलीस कर्मचारी आपल्या काही गुन्हेगार मित्रांसह आर बी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्या ठिकाणी नशेत असलेल्या मनोज आणि त्याच्या गुंड मित्रांचा रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला.

रागावलेल्या गुंडांनी त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करणं सुरु केलं. टेबल खुर्ची फेकल्या, काचा फोडून टाकल्या, मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्यानंतर सर्व गुंड तिथून आरामात निघून गेले. पोलीस कर्मचारी आणि त्याच्या गुंड मित्रांचा हा हैदोस पाहून रेस्टॉरंटमध्ये आलेल्या अनेक सामान्य नागरिक आणि कुटुंबांनी तिथून पळ काढला.

दरम्यान, पोलीस कर्मचारी आणि त्याच्या गुंड मित्रांची ही गुंडगिरी सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद झाली. आर बी रेस्टॉरंटच्या मालकाच्या तक्रारीवर पोलिसांनी मनोज घोडे आणि त्याच्या 8 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

शिवाय पोलीस कर्मचाऱ्याची ही गुंडगिरी पाहून पोलीस आयुक्तांनी मनोज घोडेला निलंबितही केलं. मात्र, पोलिसांचा हा गुंडाराज नागपूरकरांना धक्का देणारा ठरला आहे. कारण, नागपुरातील गुंडगिरी रोखण्याचं आव्हान ज्यांच्यासमोर आहे, तेच गुंडांच्या टोळक्यात असतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.