फुलकोबीचे गड्डे फोडणाऱ्या शेतकऱ्याची उद्धव ठाकरेंशी भेट
एबीपी माझा वेब टीम | 21 Mar 2018 05:10 PM (IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बोलावून प्रेमसिंगला धीर दिला.
मुंबई : शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे व्यथित होऊन शेतातील फुलकोबीचे गड्डे फावड्याने तोडून टाकणाऱ्या शेतकऱ्याला शिवसेनेने धीर दिला. जालन्याचा शेतकरी प्रेमसिंग चव्हाणला स्मृती प्रतिष्ठानकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. जालना जिल्ह्यातील पोहेगावमधील शेतकरी प्रेमसिंग चव्हाण याने शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आपल्या शेतात पिकवलेली भाजी उद्विग्न होऊन तोडून टाकली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 'एबीपी माझा'ने प्रेमसिंगची व्यथा जाणून घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बोलावून प्रेमसिंगला धीर दिला. उद्धव ठाकरेंच्या हस्ते 'स्मृती प्रतिष्ठान'तर्फे प्रेमसिंगला आर्थिक मदतही देण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.