मुंबई :  महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) बांधून पूर्ण झाला आहे.   येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi)  हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. गेली काही वर्षे निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती मात्र हा नवीन मार्ग कसा आहे हे जाणून घेऊया. 


मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू  शिवडी इथून सुरू झाला ज्या ठिकाणावरून एम टी एच एल ची सुरुवात होते. हा रस्ता शिवडी येथून थेट समुद्रिमार्गे चिरले गावी म्हणजेच न्हावा शेवापर्यंत जातो. एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. सध्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी छोटे मोठे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या प्रकपाच्या बांधकामास सुरुवात झाली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. म्हणूनच या प्रकल्पाचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड म्हणजे हा प्रकल्प असेल. 


कसा आहे पूल?



  • MTHL पुलाची एकूण लांबी 21.8 किमी आहे ज्यामध्ये समुद्रावरील लांबी 16.50 किमी आहे आणि जमिनीवरील भाग 5.5 किमी आहे.

  • या सी लिंकमध्ये दोन्ही बाजूला 6-लेन (3+3 लेन) महामार्ग+1 आपत्कालीन लेन आहे.
     
    मुंबईतील शिवडी, शिवाजी-नगर आणि जासई येथे SH-54 आणि NH-348 वर चिर्ले येथे इंटरचेंज आहेत.

  • 90 मी ते 180 मीटर लांबीचे 7 ओएसडी (ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक) स्पॅन आहेत जे भारतात प्रथमच पुलावर वापरले गेले आहेत. 

  • या पुलावरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. तर रिटर्न प्रवासासाठी 375 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. 

  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळवळण शक्य होईल. 

  • मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे. इंधनाची बचत होईल. वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच नवीन गुंतवणूक होऊन रोजगार वाढेल. 


ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता


 सध्या फ्री वे आणि शिवडी येथून या पुलावर जाता येते. भविष्यात कोस्टल रोडला देखील जोडण्यात येईल.  प्रत्येक 100 मीटरवर अद्ययावत सीसीटिव्ही कॅमेरे बसलेले आहेत. एकूण 130 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  रस्त्याचे बांधकाम उत्कृष्ठ दर्जाचे आहे. प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना उत्तम आहेत.  फ्लेमिंगो जवळून जात असलेल्या पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावण्यात आले आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो आणि इतर कांडळवनातील वन्य जीवांना त्रास कमी होईल. विशिष्ठ अंतरावर स्पिडोमीटर्स लावण्यात आल्याने आपल्याला आपल्या वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा लक्षात येते. पुलावर काही ठिकाणी 100 किमी प्रतींतास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किमी प्रतीतास अशी वेग मर्यादा आहे. या पुलावरून प्रवास करताना आपल्याला तोंड भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता आहे.  


हे ही वाचा :