6th January In History:  इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. अनेक घटनांनी  इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 6 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल (Louis braille Death Anniversary) यांचं आजच्याच दिवशी 1809 साली निधन झालं होतं. आज म्हणजेच मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज सुरू केले. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. प्रसिद्ध नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर (Vijay Tendulakar) यांचा जन्म आजच्याच दिवशी मुंबईत झालेला. आज संगीतकार ए.आर.रहमान  (A. R. Rahman)  तसेच माजी क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांचा वाढदिवस आहे. 



1809: ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचं निधन (Louis braille Death Anniversary)


ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचं आजच्याच दिवशी 1809 साली निधन झालं होतं. त्यांचा जन्मदिवस चार जानेवारी हा जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक ब्रेल दिन हा अंध आणि दृष्टिबाधित व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी साजरा करण्यात येतो. ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल (Louis braille) यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस निवडण्यात आला आहे. लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. त्यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्समध्ये झाला होता. लुई ब्रेल यांनी शोधलेली लिपी आज अनेक अंध व्यक्तींसाठी शिक्षणाचं माध्यम झाली आहे. ब्रेल यांच्या नावावरुन याला ब्रेल लिपी असं म्हटले जाते. 2019 पासून जगभरात चार जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 


1812 : आज मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din)


मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज सुरू केले. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. 1838 साली मुहूर्तमेढ रोवत सुरू केलेल्या पत्रकारितेतून पहिलं मराठी दैनिक देखील 6 जानेवारीला प्रकाशित केल्याने हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 


1928 :  विजय तेंडुलकर यांचा जन्म (Vijay Tendulkar Birth Anniversary)  


प्रसिद्ध नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1928 साली मुंबई येथील मुगभाट , गिरगांव येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते. त्यातच त्यांचा संबंध विविध विचारसरणीशी आला होता. 



विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या नाटकांनी तर रंगभूमीच नव्हे तर समाजकारण, राजकारणातही वादळ आणलं. शांतता! कोर्ट चालू आहे. सखाराम बाईंडर, काशीराम कोतवाल, गिधाडे आदी नाटके चांगलीच गाजली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.


विजय तेंडुलकर यांनी चित्रपट माध्यमही ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या.


कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. 1970 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. 1977 मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 1981 मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार, तर 1983 मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला. विजय तेंडुलकर यांना भारत सरकारने 'पद्मभूषण' या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


1959 : कपिल देव यांचा जन्म  (Kapil Dev Birthday)


भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. कपिल देव यांनी भारताकडून 1970  भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. त्यांनी 1994 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला. यादरम्यान त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना 225 एकदिवसीय सामन्यात 253 विकेट्स आणि3 हजार 783 धावा केल्या आहेत. तर, कसोटीमध्ये त्यांनी 131 सामन्यात 434 विकेट्स आणि 5 हजार 248 धावा केल्या आहेत.


1967 : ऑस्कर पुरस्कार विजेते  गायक ए. आर. रहमान यांचा जन्म (A. R. Rahman Birthday) 


प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानचा (A. R. Rahman)  आज वाढदिवस. ए.आर.रहमान यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ए.आर. रहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. ए.आर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ए.आर रहमान यांचे खरे नाव ए.एस दिलीप कुमार आहे. हे नाव त्यांनी नंतर बदलले. एआर रहमान यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती. 


ए. आर. रहमान यांना संगीताचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील आरके शेखर हे मल्याळम चित्रपटांमधील गाण्यांना संगीत द्यायचे. ए आर रहमान हे  मास्टर धनराज यांच्याकडून संगीतातील बारकावे शिकले.  लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून शिष्यवृत्तीही मिळाली.  ए आर रहमान यांनी  Western classical music मध्ये डिप्लोमा केला. एआर रहमान यांनी 1992 मध्ये 'रोजा' चित्रपटात संगीत दिले. या चित्रपटातील सर्व गाणी हिट ठरली. तसेच त्यांनी 'दिल से', 'ख्वाजा मेरे ख्वाजा', 'जय हो''बॉम्बे', 'रंगीला', 'दिल से', 'ताल', 'जींस', 'पुकार', 'फिजा', 'लगान', 'स्वदेस', 'जोधा-अकबर', 'युवराज', 'स्लमडॉग मिलेनियर'  आणि 'मोहेंजो दारो' या चित्रपटांना संगीत दिलं. 


रहमान यांना आजवर दोन ऑस्कर पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 फिल्मफेअर पुरस्कार आणि 13 फिल्मफेअर पुरस्कार (दक्षिणात्य चित्रपट) मिळाले आहेत. 


 2017 : भारतीय अभिनेते ओम पुरी यांचे निधन (Om Puri Death Anniversary)


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी (Om Puri) यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने खूप प्रसिद्धी कमावली. ओम पुरींनी त्यांच्या वेगवेगळ्या पात्रांनी मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली. त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पटियाला येथून झाले. बालपणी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. 


ओम पुरी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटातून केली होती. 1983मध्ये आलेल्या ‘अर्ध सत्य’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. घरची परिस्थिती खराब असल्याने ओम पुरी वयाच्या सहाव्या वर्षी चहाच्या स्टॉलवर चहाची भांडी साफ करायचे. पण, अभिनयाची आवड त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत घेऊन गेली. 1988 मध्ये, ओम पुरी यांनी दूरदर्शनच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका 'भारत एक खोज' मध्ये अनेक भूमिका साकारल्या, ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.


>> इतर महत्त्वाच्या घडामोडी : 


1665 : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
1883:  लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार खलील जिब्रान यांचा जन्म. त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलं. 
1885 :  आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक भारतेंदू हरिश्चंद्र (Bhartendu Harishchandra) यांचा मृत्यू 
1919 : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे 26 वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे निधन
1924 :  स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांची जन्मठेपेतून सशर्त मुक्तता. 
1989: इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) हत्या करण्याच्या गुन्ह्यात केहर सिंह आणि सतवंत सिंह यांना  फाशीची शिक्षा देण्यात आली.