Maharashtra Weather Update Today : राज्यात पुढील 48 तासात पावसाची रिमझिम (Unseasonal Rain) पाहायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील तापमानात थोडा बदल पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या राज्यातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत कोकणासह काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.


महाराष्ट्रात पुढील 48 तासात पावसाची शक्यता


राज्यात पुढील 48 तासात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई उपनगरात सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून थंडीचा कडाका कमी झाला आहे. मुंबईत सध्या किमान तापमानात किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे, पालघरमध्ये पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत गारठा जाणवत आहे, तर दुपारी उन्हाची झळ सोसावी लागत आहे. 


कोकणासह 'या' भागात पावसाचा अंदाज


आज आणि उद्या कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्येही पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, अहमदनगर येथेही आज आणि उद्या हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनदर, आणि छत्रपती संभाजीनगर भागात विजाच्या कडकडाटासह पावसाच्या मध्य सरी पाहायला मिळतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


राज्यातील किमान तापमानात वाढ


पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने हवामानातील बदलाचे संकेत मिळत आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळच आहे. त्यामुळे किमान तापमानातही वाढ होत आहे.


आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता


पुढील काही दिवसांमध्ये आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होऊ शकतो, ज्याचा परिणाम महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, यामुळे रात्रीच्या तापमानात आणखी वाढ होऊ शकते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात सध्या वाढ झाली आहे, तर उत्तर भारतातील इतर भागांमध्ये रात्रीचे तापमान सामान्य आणि दिवसा अत्यंत थंड वातावरण जाणवत आहे.