Mumbai Police Recruitment : तीन मुलं असलेल्या पोलिसाच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार? सरकारने हायकोर्टात स्पष्टच सांगितले
Police Recruitment : तीन अपत्य असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या वारसाला कोणत्याही प्रकारे अनुकंपा तत्वावर नोकरी देता येत नसल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
High Court On Mumbai Police Recruitment : तीन मुलं असलेल्या पोलिसाच्या (Maharashtra Police) कोणत्याच वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी देता येत नाही, असा थेट अध्यादेशच सामान्य प्रशासन विभागानं काढल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High Court) दिली आहे. 31 डिसेंबर 2001 नंतर ज्या पोलीस कर्मचा-याला तिसरं अपत्य झाले आहे, त्यासर्वांना हा नियम लागू होतो.
न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मात्र सामान्य प्रशासन विभागाचा हा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला नाही, त्यामुळे तो लागू होत नाही, असा दावा करत सुनील अहिरे यांच्या मुलांनी अॅड. दिनेश अडसुळे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आम्ही याबाबत सविस्तर सुनावणी घेऊ, असं स्पष्ट करत हायकोर्टानं सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.
काय आहे प्रकरण?
ठाणे पोलीस दलातील पोलीस नाईक सुनील अहिरे यांचं 18 फेब्रुवारी 2013 रोजी निधन झालं. त्यांच्या जागेवर मुलाला अनुकंपा नोकरी मिळावी यासाठी त्यांची पत्नी विद्या आणि मुलगा मनिष यांनी ही याचिका दाखल केली आहे. साल 1994, 1996 व 2001 मधील सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशानुसार पोलिसाच्या वारसाला अनुकंपा नोकरी देता येते. त्यानुसार मनिषला अनुकंपा नोकरी द्यावी, असा अर्ज प्रशासनाकडे करण्यात आला होता. मात्र पोलीस खात्यानं अनुकंपा नोकरी नाकारली. त्याविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट) याविरोधात दाद मागण्यात आली. मॅटनंही अनुकंपा नोकरीचा दावा नाकारला. त्याविरोधात अहिरे कुटुंबानं अनुकंपा नोकरीची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल आली आहे. तसेच काही प्रकरणांत तीन अपत्य असलेल्यांनाही अनुकंपा तत्वावर नोकरी दिल्याचा दावाही त्यांनी याचिकेतून केलेला आहे.
राज्य सरकारची भूमिका
ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेंद्र जगन्नाथ शिरसाट यांनी हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. अनुकंपा नोकरी कोणाला देता येईल? याचे निकष सांगणारा अध्यादेश 28 मार्च 2001 रोजी सामान्य प्रशासन विभागानं काढला आहे. ज्यात तीन अपत्य असलेल्या पोलिसाचा कोणताच वारस हा अनुकंपा नोकरीसाठी पात्र नाही, असं स्पष्ट केलेलं आहे आणि हा अध्यादेश सर्व पोलिसांना ज्ञात आहे, असा दावाही प्रतिज्ञापत्रातून करण्यात आलेला आहे.
31 डिसेबर 2001 नंतर ज्या पोलिसाला तिसरं अपत्य झालंय त्याला हा नियम लागू होतो. पोलीस नाईक सुनील अहिरे यांना तीन मुलं आहेत. त्यांच्या तिसऱ्या मुलाचा जन्म 7 ऑगस्ट 2002 रोजी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा नोकरी देता येणार नाही, असा दावा या प्रतिज्ञापत्रातून करण्यात आला आहे.
मात्र सिद्धेश सावंत या पोलिसाला तीन मुलं असतानाही त्याच्या वारसाला अनुकंपा नोकरी देण्यात आल्याचा आरोपही चुकीचा असल्याचे सांगण्यात आले. कारण सिद्धेश सावंत यांना जुळी मुलं आहेत. परिणामी जरी त्यांना तीन मुलं असली तरी ते प्रकरण वेगळं आहे. या याचिकेतील मुद्द्यांशी त्याचा काहीही संबंध नाही, असंही प्रतिज्ञापत्रातून नमूद करण्यात आलेलं आहे.