जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची गरज नाही; हायकोर्टाचा निर्वाळा
सोशल मीडिया पोस्टवरून तरूणाला बंगल्यावर बोलावून मारहाणीच्या प्रकरणात हायकोर्टाने हे सांगितलं आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी जबरदस्ती बंगल्यावर आणून त्यांच्यासमोरच आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील रहिवासी अनंत करमुसे यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस आव्हाडांविरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यानं याची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)मार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी करमुसे यांची याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली.
पोलीसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा नव्यानं सीबीआयकडे तपास देण्याची गरज नाही असं स्पष्ट करत करमुसे यांची ही मागणी फेटाळून लावत त्यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल 2020 रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी घरातील सर्व दिवे लावण्याचं आवाहन केलं देशातील जनतेला केलं होतं. मोदींच्या या आवाहनावर ट्वीटवरून आव्हाड यांनी सडकून टीका केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर ठाण्यातील रहिवासी आणि पेशानं अभियंता असलेल्या अनंत करमुसे या तरुणानं आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर 8 एप्रिल 2020 रोजी आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी आपल्याला जबरदस्तीनं बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोरच अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला. यादरम्यान स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला काही प्रश्न विचारले. प्रचंड मारहाण झाल्यानं आपण आव्हाड यांची माफी मागत ती पोस्ट डिलीटही केली. मात्र तरीही पुन्हा आव्हाड यांच्यासमोर मारहाण करून मग वर्तक नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं, असं त्यानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
मात्र पोलिसांनी या तरुणाची अवस्था बघून त्याला रुग्णालयात दाखल केलं. ज्यात वैद्यकीय तपासणी केल्यावर त्याला जबर मारहाण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या तरुणानं दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तींच्या विरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून करमुसेवर देखील आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला गेला.