ED Raids In Mumbai Covid Scam:  कोविड सेंटर कथित गैरव्यवहाराप्रकरणी (BMC Covid Scam) ईडीनं (ED) बुधवारी ठाकरे गटातील नेत्यांच्या निकटवर्तीयांसह 15 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. ईडीने बुधवारी केलेल्या धाड सत्रात अंदाजे 150 कोटी रुपये किमतीच्या मालमत्तांची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


बुधवारी सकाळी ईडीने कारवाईस सुरुवात केली होती. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्ती मानले जाणारे पक्षाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल, महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरीदेखील ईडीचे पथक धडकले. या धाडसत्रामुळे एकच खळबळ उडाली होती. 


ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 मालमत्तांची कागदपत्रे सापडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याशिवाय, 15 कोटी रुपयांची मुदत ठेव (Fixed Deposite) असलेली कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतली आहेत. त्याशिवाय, अडीच कोटींचा मुद्देमाल ED ने ताब्यात घेतला आहे. यात 68 लाख रोख रक्कम तर इतर 1 कोटी 82 लाखांचे सोन्याचे दागिने असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
सुजित पाटकरांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला देण्यात आलं होतं. याच कंपनीनं घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याप्रकरणी आता ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.


प्रकरण नेमकं काय? महापालिकेचे अधिकारी रडारवर का?


ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस हॉस्पिटलच्या टेंडर बोलीच्या वेळी संजीव जैयस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि महत्त्वाचं म्हणजे स्थापन करण्यात आलेल्या समितीचा भाग होते. ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिलं. 


टेंडर प्रक्रियेवेळी ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचं आहे, त्या कंपनीकडे पूर्वीचा अनुभव आणि पात्रता याचा विचार करून एक कंत्राट देणं क्रमप्राप्त होतं. मात्र तपासात या कंपनीला पुरेसा अनुभव नसताना शिवाय या कंपनीकडे रुग्णसेवेसाठी पुरेशी मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध नसतानासुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. 


संजीव जैयस्वाल यांनी असं असतानासुद्धा या कंपनीला कंत्राट का दिलं? याची ईडीकडून कसून चौकशी करत आहे. संजीव जैयस्वाल यांच्याशी काही इतर महानगर पालिका अधिकारी यांच्या घरीसुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. जैयस्वाल व्यतिरिक्त, ईडीनं महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार आणि बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही छापे टाकले आहेत. जे केंद्रीय खरेदी विभागात होते, ज्यांनी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि इतर साहित्य पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी होते.


>> या सगळ्या प्रकरणांमध्ये आरोप नेमके काय आहेत?


- आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट
- करारासाठी बनावट कागदपत्रे सादर
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकल्याची माहिती कंपनीने लपविली
- 100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप
- 38 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा