Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी एका तरुणाला फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. तर शिवीगाळ करतानाचा कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भुमरे यांच्या मुलाबद्दल अपशब्द काढल्याने या तरुणाला भुमरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. बाबासाहेब वाघ असं शिवीगाळ झालेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) या तरुणाचा संवाद करून दिला. तर उद्धव ठाकरे यांनी घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत, शिवसैनिक तुझं रक्षण करतील, असे आश्वासन तरुणाला दिले.
काय आहे प्रकरण?
संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील दरकवाडी गावात बाबासाहेब वाघ नावाचा तरुण राहतो. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याच्या गावात रस्त्याचे काम सुरु झाले होते. मात्र रस्ता न करताच पैसे उचलण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. तर हे काम संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचे असल्याचे गावातील लोकांनी सांगितल्याने आपण भुमरे यांच्या पीए यांना फोन करून कामाबद्दल विचारणा केली होती, असं मारहाण झालेल्या तरुणाचे म्हणणे आहे. दरम्यान, याचाच राग आल्याने भुमरे यांनी या तरुणाला शिवीगाळ केली. तसेच तुझ्या घरी येतो, असे म्हणाले. त्यामुळे आपण प्रचंड दहशतीत असल्याचं तरुणाने म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंशी संवाद...
भुमरे यांनी शिवीगाळ केल्याने हा तरुण प्रचंड दहशतीखाली आहे. त्यामुळे त्याने आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन लावून मारहाण झालेल्या तरुणाचे संवाद करून दिले. दरम्यान यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांनी घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत, शिवसैनिक तुझं रक्षण करतील असे आश्वासन तरुणाला दिले.
यापूर्वी देखील झाला होता आरोप
म्हणजे यापूर्वी देर्खील भुमरे यांच्यावर असाच फोनवरून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. माझ्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट का केली, म्हणत भुमरे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केला होता. तसेच पाचोड गावात आल्यावर तुला दाखवतो, नाहीतर तुझ्या घरी पोरं पाठवून मारायला लावतो अशी धमकी दिली. तसेच पोलिसात खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्याची धमकी देत, मी पालकमंत्री असून माझं काहीही होऊ शकत नसल्याची धमकी भुमरे यांनी दिल्याचा आरोप सुद्धा या तरुणाने केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या :
Sandipan Bhumre: सोशल मीडियावर विरोधात पोस्ट, भूमरेंची तरुणाला फोनवरून धमकी? पोलिसात तक्रार दाखल