मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि खासदार संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकर या दोघांच्याही घरी आज ईडीनं धाड टाकली. त्याचसोबत मुंबई पालिकेतील उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी ईडीची छापेमारी करण्यात आली आहे.  कोरोना काळातील कथित घोटाळा प्रकरणांमध्ये या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे. या धाडसत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर टाकण्यात आलेल्या या धाडी राजकीय असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाणांच्या चेंबूरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली. सकाळी सव्वा आठच्या सुमारास ईडीचं पाच अधिकाऱ्यांचं पथक सूरज चव्हाणांच्या घरी दाखल झालं आणि त्यांची चौकशी सुरू झाली. 


विविध निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पदड्यामागची गणितं सूरज चव्हाणांच्या हाती असतात. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच 


खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांच्या घरी आणि कार्यालयामध्ये ईडीनं धाड टाकली. सुजित पाटकरांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला देण्यात आलं होतं. याच कंपनीनं घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याप्रकरणी आता ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.


मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरावर ईडीने सकाळी धाड टाकली असून गेल्या 12 तासांहून जास्त काळापासून त्यांची चौकशी सुरू आहे. कोरोना काळातील कथित घोटाळा प्रकरणांमध्ये या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे. बीएमसीचे माजी वरिष्ठ अधिकारी संजीव जयस्वाल आणि इतर महानगर पालिका अधिकाऱ्याच्या घरीही ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. 


शिवसेना ठाकरे गटाची प्रतिक्रिया 


ईडीच्या कारवाईनं शिवसैनिकांचं खच्चीकरण होणार नाही, सूडबुद्धीने ईडीची कारवाई सुरु आहे, ईडीच्या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते, मग फक्त सुरज चव्हाणला टार्गेट का केलं जातंय? माजी बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी व्हावी. 


प्रकरण नेमकं काय? 


कोरोनाच्या काळात मुंबईत अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले. मुंबईतील दहिसर येथे असंच एक कोविड केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे उद्योगपती सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधलं असल्याचा आरोप सातत्यानं केला जात आहे. त्यासाठी सुजित पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केली. ज्याला लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असं नाव देण्यात आलं होतं.


माहितीनुसार, हे कोविड सेंटर 242 ऑक्सिजन बेडसह उभारण्यात आलं होतं. तिथे, दहिसर केंद्रात आणखी 120 रेग्युलर बेड होते. सुजित पाटकर यांना या कामाचं कंत्राट मिळालं होतं. ते चालवण्यासाठी जून 2020 मध्ये डॉक्टरांशी करार करण्यात आला आणि बीएमसीनं कंत्राट दिलं. त्यांच्या घरावर छापा टाकताना अंमलबजावणी संचालनालयाला (ED) एक कागद सापडल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. याच आधारे असा आरोप केला जात आहे की, कंत्राट मिळून जवळपास एक वर्षानंतर आणि कंपनीच्या खात्यात 32 कोटी रुपये जमा झाल्यानंतर कोविड परिसरातील रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी बीएमसीसोबत करार करण्यात आला होता.