Mumbai: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मरीन ड्राईव्ह वसतिगृहातील प्रकरणसाह अन्य राजकीय मुद्दयांवर भाष्य केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या भमिकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


'वसतिगृहात बेजबाबदारपणा पाहायला मिळाला'


मरीन ड्राईव्हजवळील सरकारी महिला हॉस्टलमध्ये तरुणीवर अतिप्रसंग करुन तिची हत्या (Marine Drive Hostel Girl Murder) करण्यात आली, या प्ररकणी वसतिगृहाच्या वॉर्डनशी चर्चा झाल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. या विभागाच्या मंत्री म्हणून काम केलं असल्याचं त्यांना सांगितलं, त्याच बरोबर या वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी रांग लागलेली असते, असं असताना ही घटना या वसतिगृहात कशी घडली यासंदर्भात विचारणा केल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. वसतिगृहात बेजबाबदारपणा पाहायला मिळत असल्याचं त्यांनी म्हंटलं.


'महिला वसतिगृहांमध्ये महिला सुरक्षारक्षक असल्या पाहिजे'


महिला वसतिगृहांमध्ये सर्व पोस्ट आहेत, मग सुरक्षारक्षक देखील असू द्या आणि त्या सुद्धा महिला असल्या पाहिजे, असं मत वर्षा गायकवाड यांनी मांडलं. धोबी असलेल्या माणसाला तुम्ही अचानक सुरक्षारक्षक म्हणून कसं ठेवलं, अशी विचारणा वर्षा गायकवाड यांनी वॉर्डनला केली. वसतिगृहांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेऊन चालणार नाही, तर तेथील सुरक्षेसंदर्भात कठोर पावलं उचलली गेली पाहिजे, असं त्या म्हणाल्या. वॉर्डनचीसुद्धा यामध्ये मोठी जबाबदारी होती, मुलींसाठी सखी समिती उभारल्या पाहिजेत आणि त्यांचं म्हणणं समोर यावं यासाठी प्लॅटफॉर्म असला पाहिजे, असं परखड मत वर्षा गायकवाड यांनी मांडलं. राज्य सरकारने मंजूर केला शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करावी, असंही त्यांनी सांगितलं.


'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक बांधिलकी राखणारा पक्ष'


राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड झाली, त्यावरही वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंना पद दिल्याचा आनंद झाला असून आता महिला सक्षमीकरण फक्त बोलण्यातून होणार नाही, असं त्या म्हणाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक बांधिलकी वारसा जपण्याचं काम करतं, जातीपातीचं राजकारण न करता महिलांना संधी देण्याचं काम पक्षांकडून केलं जात असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. एक चांगला निर्णय काँग्रेसने घेतला आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलं, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोघांचं वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केलं आहे.


'राज्यात सुद्धा महिला मंत्री व्हावी'


महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात सुद्धा महिला मंत्री व्हावी, अशी विनंती वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला केली आहे. महिलांना संधी मिळत राहावी, कारण ज्या प्रकारे महिलांचे प्रश्न समोर येत आहेत ते पाहता हे करणं महत्त्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर सुद्धा चांगला परिणाम होईल आणि सुप्रिया सुळेंनी  संसदेमध्ये काम केलं आहे, त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. महिलांना संधी देण्याचं काम त्यांनी केलं असल्याचंही त्या म्हणाल्या.


'मुंबई पालिका निवडणुकीबद्दल...'


मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही.आम्ही एकला चलो रे जाणार की नाही? यावर आता बोलणार नाही, तर येत्या काळात यावर बोलू, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिली. संघटन मजबूत करणं, कार्यकर्त्यांना सन्मान देणं हे माझं काम असल्याचं त्या म्हणाल्या. निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे आणि त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.


हेही वाचा:


मोठी बातमी! बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा; येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार