मुंबई : कोरोनाच्या टेस्टिंगसाठी मुंबईतील एका इंटिरियर डिझायनरनं तयार केलीय 'स्मार्ट ओपीडी सिस्टम'. विलेपार्ले येथील जतीन शाह यांनी खास कोरोनाच्या तपासणीसाठी ही कॉम्पॅक्ट कोविट टेस्टिंग केबिन तयार केली आहे. आठ बाय चार फूट या आकाराची ही केबिन एक्रेलिक, काच आणि अॅल्युमिनियमचा वापर करून तयार करण्यात आली आहेत. या केबिनमध्ये प्रामुख्यानं दोन भाग आहेत. टेस्टिंग करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एक आणि दुसरा चाचणीसाठी येणाऱ्या पेशंटसाठी. या संपूर्ण केबिनचं नियंत्रण हे वैद्यकीय अधिकारी आपल्या जागेवरून करू शकतो. अतिशय कॉम्पॅक्ट आणि स्मार्ट असलेली ही केबिन विमानतळ, रेल्वे स्टेशन, मॉल्स, पार्किंग लॉट, महत्त्वाची सरकारी कार्यालयं, बँकांची मुख्यालय अशा ठिकाणी अगदी सहज सामावता येऊ शकतात. ज्याच्या सहाय्याने दिवसाला जवळपास 400 जणांची चाचणी करता येणं सहज शक्य आहे.


पेशंटसाठी उघडणारा दरवाजा, आत येताच त्याच्यावर सॅनियाटझेशनचा शॉवर, फॉर्म भरण्यासाठी टॅब, पेशंटशी संवाद साधण्यासाठी माईक आणि स्पीकर या सर्व गोष्टी बटनाच्या एका क्लिकवर उपलब्ध आहेत. त्यानंतर पेशंटशी कुठल्याही प्रकराचा थेट संपर्क न करता त्याची मोठ्या रबर ग्लोव्हजच्या सहाय्याने चाचणी करण्यात येते. सध्याची गरमी पाहता या केबिनमध्ये छोटे फॅन आणि हवा खेळती ठेवण्यासाठी एक्झॉस्ट फॅनदेखील बसवण्यात आला आहे. परदेशी बनावटीच्या अशाच केबिनची किंमत पाच लाखांच्या आसपास आहे. मात्रनं जतीननं आपल्या कल्पकतेनं ही केबिन्स अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिली आहेत.


व्हरायटी ट्रेडिंगच्या माध्यमातून मुंबईत इंटिरियरची कामं करण हा जतीन यांचा मुख्य व्यवसाय. मात्र सध्या जगभरात कोरोना विषाणूनं जो धुमाकूळ घातलाय. तो पाहता भारतानं जगातला सर्वात मोठा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. कोविड चाचणी करण्यासाठी सरकारी आणि पालिका रूग्णालयांबाहेर लोकांच्या लांबच्या लांब रांग लागू लागल्या. अशा भीषण परिस्थितीत आपल्या कौशल्याचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल? या विचारात असताना जतीन यांना या कॉम्पक्ट केबिनची कल्पना सुचली. जतीननं ही संकल्पना आपले काका अमृतलाल शाह यांना सांगितली. त्यानंतर या दोघांनी मिळून या स्मार्ट केबिनचा एक आराखडा तयार करून देशभरातील काही राज्य सरकारकडे सादर केला.


महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यातून जतीनला या स्मार्ट केबिनसाठी त्यांना पहिली ऑर्डर मिळाली. जतीननं तयार केलेली पहिली 12 केबिन्स नुकतीच गोवा सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आलीत. गोव्या पाठोपाठ आता कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारशी जतीन यांची या कॉम्पॅक्ट कोविड टेस्टिंग केबिनसाठी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे.


संबंधित बातम्या




Plasma Therapy | प्लाझ्मा थेरपी अजून प्रायोगिक पातळीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती