मुंबई : कोरोना व्हायरसशी फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस दलात 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरात थांबण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तात सहभागी होऊ नये, असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24X7 ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या तीन दिवसात मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने पावलं उचलत 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश दिले आहेत.


महत्त्वाचं म्हणजे जे पोलीस कर्मचारी कोरोनामुळे दगावले त्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त होतं. त्यामुळे पोलीस कर्मचारी पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुक्त परमबीर सिंह यांनी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू


सलग तीन दिवसात मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या सगळ्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त होतं.


- कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदाराचं (वय 56 वर्षे) काल (27 एप्रिल) निधन झालं.


- मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार (वय 52 वर्षे) रविवारी (26 एप्रिल) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यू झाला.


- तर त्याआधी शनिवारी (25 एप्रिलला) वाकोला पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलचा (वय 57 वर्षे) कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.


पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत आणि सरकारी नोकरी : गृहमंत्री
कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत आणि योग्य ती शासकीय नोकरी तसंच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. "पोलीस बांधवांचा मृत्यू ही अतिशय दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे," असंही ते म्हणाले.





Coronavirus | राज्यातील 64 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; यापैकी 34 पोलिस मुंबईतील