मुंबई : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह सोहळे, साखरपुडा त्यांनी पुढे ढकलले. मात्र या परिस्थितीत सुद्धा आपला विवाह सोहळा नियोजित तारखेला, वेळेला व्हावा यासाठी अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील एका जोडप्याने आपला विवाह सोहळा ऑनलाइन करायचं ठरवले. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण दिलं. या निमंत्रणात दिलेल्या युट्युब चॅनेल आणि फेसबुक पेजच्या लिंकद्वारे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने लग्नाला उपस्थिती लावली. इतकाच काय तर या लग्नाला ऑनलाइन अक्षदा पडत होत्या.


दिड वर्षांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या किरण निंबोरे याचा श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या राणी डफळशी लग्न ठरलं. मात्र या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि हे लग्न पुढे ढकलण्याचा दोघांच्या घरच्यांनी विचार केला. मात्र, आपलं लग्न हे 27 एप्रिल दुपारी साडेचारला झालं पाहिजे असं ठरवून या जोडप्याने आपल्या आई वडील, घरच्यांना याबाबत समजून सांगितलं आणि ऑनलाइन विवाह करायचा ठरवलं. यासाठी निमंत्रण पत्रिका सोशल नेटवर्किंगवर पाठवून आमच्या लग्नाला ऑनलाइन उपस्थित रहायचं नातेवाईक आणि मित्रपरिवाला सांगितलं आहे.


हा ऑनलाइन विवाह सोहळा अगदी घरच्याघरी आईवडील आणि जवळचे मोजके नातेवाईक यांच्या उपस्थित सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून व इतरांना ऑनलाइन उपस्थित करून हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेकांनी ऑनलाइन आशिर्वाद देऊन या विवाह सोहळ्याचं कौतुक केलं.


किरण निंबोरे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याने त्याला लॉकडाऊन काळात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यात अडकून पडल्याने त्यांना होणारा त्रास, अडचणी कमी करण्यासाठी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाला लग्नसाठी जमा केलेले पैसे मदत म्हणून वापरणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन विवाह सोहळ्याने एक सामाजिक संदेश देऊन माणुसकी दाखवून दिल्याने या विवाह सोहळ्याचं कौतुक गावात केलं जातंय.


संबंधित बातम्या :

Coronavirus | Cyber Crime | कोरोनासोबत देशासमोर सायबर क्राईमचं संकट,सायबर गुन्ह्यांमध्ये दुपटीनं वाढ