मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून मुंबै जिल्हा बँकेवरचे प्रवीण दरेकरांचे वर्चस्व आता संपुष्ठात आलं आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे. दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली.


आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर,  सुरज चव्हाण यांनी शिवसेनेच्या तीन उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. संख्याबळ जास्त असल्यानं अध्यक्षपद राष्ट्रवादीला द्यायचं  यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आठ उमेदवारांना मिलिंद नार्वेकर आणि सुरज चव्हाण यांनी सह्याद्रीवर बोलावलं


महाविकास आघाडीच्या 11 उमेदवारांसोबत मिलिंद नार्वेकर आणि सुरज चव्हाण यांनी सह्याद्रीवर बैठक घेतली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी अभिषेक घोसाळकर याचं नाव अंतिम झालं. त्यानंतर सर्वांना एकत्र आमदार सुनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली  मुंबै बॅंकेत पाठवलं. या निवडणुकीत 11 संख्याबळ महाविकास आघाडीचं होतं तर भाजपचं नऊ संख्याबळ होतं. त्यामुळे पराभव लक्षात घेता प्रविण दरेकर यांनी अर्ज न भरता प्रसाद लाड यांना अध्यक्षपदासाठी उमेदवार घोषित केला.  सिद्धार्थ कांबळे यांनी अध्यक्षपद जिंकलं तर उपाध्यक्ष पदासाठी  महाविकास आघाडीतलं एक मत फुटले समसमान निकाल लागला . ईश्वर चिठ्ठीनं भाजपच्या विठ्ठल भोसले यांना विजयी घोषित करण्यात आलं .


सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनीच गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची कमान सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई बँकेचे अध्यक्षपद हे एक वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :