मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, मुंबई बँकेवर संचालक म्हणून बिनविरोधात निवडून गेलेले प्रविण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. सहकार विभागाने ही कारवाई केली आहे. सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना तुम्ही मजूर आहात का, अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. यावर चौकशी करुन सहकार विभागाने दरेकर मजूर नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे प्रविण दरेकर यांना सहकार विभागाने चांगलाच दणका दिला आहे.


प्रविण दरेकरांना अपात्र ठरवताना विधानपरिषद निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्राकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रात दरेकर यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केले आहे. तसेच दरेकर यांची मालमत्ता 2 कोटी 9 लाख असून, त्यांच्या नावावर 90 लाखांची संपत्ती असल्याचंही प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून दरमहा अडीच लाख मानधन मिळत असल्याने त्यांना मजूर म्हणता येणार नाही असं सहकार विभागाने स्पष्ट केलं आहे.


दरम्यान, यावर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत अपात्रतेची कारवाई झालेली नाही. मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे काही जण माध्यमांना हाताशी धरत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. व्यक्तीगत द्वेषातून ही कारवाई सुरू असल्याचे दरेकर म्हणाले. मी दोन ठिकाणी निवडून आलो आहे.  मी काल निकाल घोषीत झाल्यानंतर मजूर विभातून निवडून आलो त्याचा राजीनामा दिला असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.


मुंबै बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच सहकार विभागाने दरेकर यांना अपात्र घोषित केले आले आहे. या निमित्ताने 1997 पासून मुंबै बँकेवर याच प्रवर्गातून संचालक बनलेल्या दरेकर यांनी मजूर नसतानाही निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. आमदार म्हणून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील कोटयवधींची मालमत्ता तसेच व्यावसायिक म्हणून केलेली नोंद आणि आमदार- विरोधी पक्षनेते म्हणून अडीच लाख रुपये मानधन मिळविणारी व्यक्ती मजूर असूच शकत नाही हेही या आदेशामुळे स्पष्ट झाले  आहे.


मुंबै बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांच्यासह सहकार पॅनेलचा विजय झाला असताना दुसरीकडे प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे. गेली अनेक वर्षे आमदार असतानाही मजूर असल्याचे भसवून मुंबै बँकेत संचालक म्हणून निवडणूक लढवत होते.  ही बँकेची तसेच हजारो ठेवीदारांची फसवणूक असून याप्रकरणी आपण पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले. तर सहकार विभागाच्या आदेशाचा अभ्यास करून आपण कायदेशीर कारवाईसाठी संबंधित ठिकाणी पत्र देऊन मुंबै बँकेतील घोटाळय़ांचा पर्दाफाश करणार असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.


नेमकं धनंजय शिंदे काय म्हणालेत


प्रविण दरेकर यांनी मोठी फसवणूक केल्याची तक्रार मी सहकार विभागात केली होती. त्यानुसार त्यांना मजूर संस्थेतून अपात्र करण्याची कारवाई सहकार विभागाने केली आहे. मात्र, ते मजूर नसतानाही 1997 पासुन निवडणूक याच प्रवर्गातून लढवत आहेत. याची सहकार विभागाने साधी चौकशीही केली नसल्याचे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता जर असे चुकीचे काम करत असेल तर हे गंभीर आहे. प्रविण दरेकर यांच्यासोबत प्रसाद लाड हेही कर्मचारी प्रवर्गातून निवडून गेले आहेत, ते पण कर्मचारी आहेत का? असा सवाल धनंजय शिंदे यांनी उपस्थित केला आहे. हा मोठा घोटाळा आहे. या बॅंकेची मतदार यादी ही सदोष आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं निवडणूकच चुकीची म्हणावी लागेल.
मुख्यमंत्र्यांनी आता यावर निर्णय घ्यावा असेही धनंजय शिंदे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: