अमरावती  : अमरावतीत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पर्वावर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 फूट पुतळा स्थापन केला. सोबत राजापेठ उड्डाणपूल चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नव्याने स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आमदार रवी राणा यांनी अनावरण केले. पण आता यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या पुतळ्याची परवानगी न घेतल्याने आता महानगरपालिका काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


 अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर मंगळवारी मध्यरात्री 3 वाजता आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विनापरवानगी रातोरात पुतळा स्थापन करण्यात आल्याने महापालिका कारवाई करणार आहे. गुरुवारी रात्री पुतळा हटविण्याची कारवाई केली जाणार होती पण सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली ज्यामध्ये सांगण्यात आले की, महानगरपालिका रात्री महाराजांचा पुतळा जप्त करणार. हे होऊ न द्यायचं असेल तर जास्तीत जास्त मावळ्यांनी रात्री 10 वाजता राजापेठ उड्डाण पुलावर हजर राहावे असं आवाहन करण्यात आले आणि हजारो युवक रात्री हजर झाले. त्यामुळे की काय महानगरपालिका प्रशासनाला काहीच करता आलं नसावं..  


 महानगरपालिका प्रशासनाने सांगितले की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांची प्रतिमा स्थापन करण्यापूर्वी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा लागतो. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पुतळा स्थापन करता येतो. मात्र, राजापेठ उड्डाणपूल येथे पुतळा स्थापन करण्यापूर्वी कोणतीच परवानगी घेण्यात आली नाही. 


या प्रकरणी पोलिसांनी महानगरपालिका प्रशासनाला जबाबदार ठरविले आहे. राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यापूर्वी परवानगी घेण्यात आली नाही. 11 जानेवारीच्या रात्री पुतळा स्थापन केला जात होता. त्यावेळी राजापेठ पोलिसांनी राजापेठ मध्य झोनचे अभियंता आणि मनपा आयुक्तांना पत्र देत पुतळ्याची स्थापना होऊ नये म्हणून कारवाई करण्याबाबत विनंती केली होती. मात्र, महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत बंदोबस्त देखील लावला होता. कोणतीच कारवाई न केल्याने पोलिसांनी मनपा प्रशासनाला जबाबदार ठरविले आहे..


आता पुतळा तर बसला याला आता अधिकृत परवानगी द्यावी यासाठी आज दुपारी 2 वाजता आमदार रवी राणा यांनी महानगरपालिका मध्ये आयुक्त यांच्या सोबत बैठक घेतली आणि मागणी केली की, याला अधिकृत परवानगी द्यावी आता महानगरपालिका काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :