(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंदापूर दुर्घटना : खासदार निंबाळकरांची NDRF सोबत जलाशयात उतरुन पाहाणी, दुपारपर्यंत पुढची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती
Breaking News: माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून इंदापुरातील दुर्घटनास्थळाची पाहणी, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा. रणजितसिंह निंबाळकर NDRF टीम सोबत जलाशयात उतरले.
Bhima River Drowned Boat Updates : सोलापूर/पुणे : इंदापूर (Indapur) तालुक्यातील धक्कादायक घटनेनं संपूर्ण राज्य हादरलंय. करमाळा तालुक्यातील कुगावमधून इंदापूर तालुक्यातील काळशीकडे एक बोट (Bhima River Drowned Boat) प्रवाशांना घेऊन येत होती. यावेळी जोराचा वारा सुटल्यानं ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली. आज सकाळी ही बुडालेली बोट अखेर सापडलीय. जवळपास 35 फूट खोल पाण्यात ही बोट सापडली. पण बोटीतील सहा प्रवासी मात्र अद्याप बेपत्ता आहेत. अशातच घटनास्थळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी बातचित केली. बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून दुपारपर्यंत पुढची दिशा ठरवली जाईल, असं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बुडालेल्या बोटीतील 6 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बोटीत सात प्रवासी होते. त्यापैकी एक प्रवासी हा पोहून पाण्यातून बाहेर आल्यानं त्याचा जीव वाचला आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, "सध्या बोटीतील प्रवाशांचे चप्पल, पर्स असं साहित्य मिळालं आहे. बुडालेली बोट सापडली, दुसऱ्या बोटीनं बोट ओढत किनाऱ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला खरा, पण ती बोट एका खडकाला अडकली. बेपत्ता व्यक्तींबाबत अद्याप काहीच माहिती नाही. चार डायव्हर्स आहेत, त्यातले दोन डायव्हर्स अद्याप पाण्यातच आहेत. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत."
"नदीचं पात्र खूप मोठं आहे, 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. पुढे आलं की, धरण आहे. पाण्याचा प्रवाह आणि रात्री सुटलेला सोसाट्याचा वारा यामुळे लोक किती अंतरापर्यंत आतमध्ये गेले असतील याचा काहीच शोध लागत नाही. पण प्राथमिक अंदाजानुसार, एनडीआरएफचं पथक तपास करत आहे. दुपारपर्यंत तपासाची दुसरी दिशा ठरवली जाईल.", असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आहेत. तसेच, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी बेपत्ता असलेल्या सहा जणांच्या नातेवाईकांशीही संवाद साधल्याचं सांगितलं. बुडालेल्या 6 जणांपैकी 3 जण पट्टीचे पोहोणारे असल्याचं नातेवाईकांनी सांगितल्याचं रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट सायंकाळी सहाच्या दरम्यान सुगाव येथून कळाशीकडे उजनीच्या जलाशयातून जात होती . सायंकाळी अचानक वादळी वारा सुरु झाल्याने कळाशीच्या बाजूला पोहचत असताना बोट पाण्यातच उलटली . या बोटीत करमाळा तालुक्यातील झरे येथील एक दाम्पत्य आणि त्यांची दोन लहान मुलं, कुगाव येथील एक तरुण, एक बोट चालक आणि राहुल डोंगरे नावाचे पोलीस उपनिरीक्षक होते. बोट बुडू लागताच पोलीस अधिकारी डोंगरे यांनी पाण्यात उडी घेऊन पोहत कळाशी गावाचा काठ गाठला व स्थानिकांना बोट बुडाल्याची सूचना दिली. सहा पैकीएकाही प्रवाशाचा शोध लागलेला नाही. दरम्यान, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे देखील घटनास्थळी पोचले असून मदतकार्यात सहभागी झाले आहेत.