मंत्रिमंडळातून कामं होण्यास कोणतीही अडचण नाही, मात्र पराभतू लोक लुडबूड करतायेत, मोहिते पाटलांचा राम सातपुतेंना टोला
मंत्रिमंडळातून आमची कामं होण्यास कोणतीही अडचण नाही, फक्त पराभूत लोकं मध्ये लुडबुड करतात असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचे नाव न घेता लगावला.
Dhairyasheel Mohite Patil : मंत्रिमंडळातून आमची कामं होण्यास कोणतीही अडचण नाही, फक्त पराभूत लोकं मध्ये लुडबुड करतात असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचे नाव न घेता लगावला. त्यांच्यावर यापूर्वीच बोललेलो आहे, त्यामुळं आमच्यासाठी तो विषय संपला आहे अशा एका वाक्यात सातपुते यांच्या आरोपांना मोहिते पाटील यांनी प्रतित्युत्तर दिलं. उजनी धरणग्रस्तांसाठी बोलावलेल्या बैठकीनंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजप आमदार समाधान आवताडे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.
सोलापूर जिल्ह्यात एकही मंत्रीपद मिळत नाही हे दुर्दैव
पुण्याच्या खालोखाल मोठा असलेल्या सोलापूर जिल्ह्यात एकही मंत्रीपद मिळत नाही हे दुर्दैव आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं उसने मंत्रीपद मागावे लागत असल्याचा टोला देखील सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांना मोहिते पाटील यांना लगावला. सध्या सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. सध्या राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडली असून राज्याचे नागरिक चिंतेत आहेत. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा असे मोहिते पाटील म्हणाले. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यासारखी दुसरी घटना घडू नये, असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून यावेळी भाजपच्या राम सातपुते यांना पराभवचा धक्का बसला आहे. 2019 च्या निवडणुकीत ते मोहिते पाटील यांच्या साथीनं निवडूण आले होते. त्यावेळी मोहिते पाटील हे भाजपमध्ये होते. मात्र, 2024 च्या लोकसभेपूर्वी धैर्यशील मोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर मोहित पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे उत्तमराव जानकर यांनी देखील शरद पवार गटाच प्रवेश करुन लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाकडून उत्तमराव जानकर यांना माळशिरस मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. त्यांच्या विरोधात भाजपकडून राम सातपुते मैदानात होते. या लढतीत मोहित पाटील यांच्या साथीने उत्तमराव जानकर राम सातपुते यांचा पराभव केला आहे. त्यानंतर राम सातपुते यांनी मोहित पाटील यांच्यावर टीका टिपण्णी करत आरोप केले होते. तसेच रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा घ्यावा असी मागणी देखील भाजपकडे केली होती.
महत्वाच्या बातम्या: