MLA Shahaji Patil Sangola : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल' या डायलॉगमुळं सध्या खूप चर्चेत असलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. एबीपी माझाशी बोलताना काल त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा आनंदही आपल्या स्टाईलमध्ये व्यक्त केला. शहाजी बापूंच्या बोलण्याच्या स्टाईलची संबंध महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे त्यांचे चाहते आता त्यांना मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. 


एका बाजूला आषाढीसाठी देशभरातून लाखो भाविक विठुरायाच्या वारीसाठी पंढरीची वाट चालत असताना एका शिवसैनिकानं शहाजी पाटील यांच्या मंत्रिपदासाठी सांगोला ते मुंबई अशी अनोखी सायकलवारी सुरु केली आहे. सध्या संपूर्ण देशभर चर्चेत आलेले सांगोला येथील शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या तालुक्यातील लोकप्रिय आमदार आहेत. आता राज्यात नवीन मंत्रिमंडळ बनवायच्या हालचाली सुरु झाल्यावर शहाजीबापू यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक केदार साळुंखे यांनी आता सांगोला ते मुंबई अशी अनोखी सायकल वारी सुरु केली आहे. 


प्रत्येक बंडखोर आमदाराला या शिंदे मंत्रिमंडळात मंत्रिपदाची डोहाळे लागले असताना आता सर्वात जास्त चर्चेत असणारे शहाजीबापू यांच्या समर्थकाने सुरु केलेल्या सायकल वारीमुळे या मंत्रिपदाच्या शर्यतीत शहाजीबापू यांचेही नाव पुढे आले आहे. 


सांगोला तालुक्यातील पार येथील केदार साळुंखे यांनी विठ्ठलाला साकडे घालून ही सायकल वारी सुरु केली आहे. परवा दिवशी केदार यांची वारी मुंबई येथे पोहोचणार आहेत. यावेळी ते नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विठ्ठलाचा महाप्रसाद देऊन शहाजीबापू शिंदे यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी करणार असल्याचे केदार साळुंखे यांनी सांगितले. प्रत्येक घटनेवर मिश्किल आणि रांगडेपणाने टिप्पणी करणारे शहाजीबापू आता आपल्या या कट्टर समर्थकांच्या सायकल वारीबाबत कोणती टिपण्णी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 


आधी गणपतराव देशमुखांना हरवलं आता त्यांच्या नातवाला हरवून विधानसभेत


शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार आहेत. विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. 1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली. 1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला. 1995 मध्ये शहाजी पाटील हे 192 मतांनी निवडून आले.  त्यांनी 1995 ला गणपतराव देशमुख यांचा पराभव केला.  त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव झाला.  2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले.


इतर महत्वाच्या बातम्या


Shahaji Patil : सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे 'शहाजीबापू' कोण? पाहा त्यांची राजकीय कारकीर्द 


Shahaji Patil : काय ती झाडी, काय तो व्हायरल कॉल; शहाजीबापूंना कॉल करणारे रफिक भाई म्हणाले...