Marathwada Rain Update: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदर हजेरी लावली असून, मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी पाहायला मिळाली. मात्र दुसरीकडे पावसाची सुरवात होऊन महिना उलटला असताना मराठवाड्यात आतापर्यंत फक्त 137 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 63.3 मिलिमीटरने कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस....


औरंगाबाद जिल्ह्यात जून अखेरपर्यंत 138 मिलिमीटर पाऊस झाला आहे गेल्यावर्षी जून अखेरपर्यंतच 151.1मिलिमीटर पाऊस झाला होता. जालना जिल्ह्यात 132.1 मिलिमीटर, गेल्या वर्षी 214.7 मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात 154.2मिलिमीटर पाऊस झाला आहे, गेल्यावर्षी जून अखेरपर्यंतच190.3 मिलिमीटर पाऊस झाला होता. लातूर जिल्ह्यात 143.2 मिलिमीटर पाऊस झाला आहे, गेल्यावर्षी जून अखेरपर्यंतच 197.2  मिलिमीटर पाऊस झाला होता.


उस्मानाबाद जिल्ह्यात 106.5 मिलिमीटर पाऊस झाला आहे,गेल्यावर्षी जून अखेरपर्यंतच 137.6 मिलिमीटर पाऊस झाला होता. नांदेड जिल्ह्यात जून अखेरपर्यंतच पाऊस 141.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे, गेल्यावर्षी जून अखेरपर्यंतच 214.6 मिलिमीटर पाऊस झाला होता. परभणी जिल्ह्यात 137.4 मिलिमीटर पाऊस झाला आहे, गेल्यावर्षी जून अखेरपर्यंतच 250 मिलिमीटर पाऊस झाला होता. हिंगोली जिल्ह्यात 121.7 मिलिमीटर पाऊस झाला आहे गेल्यावर्षी जून अखेरपर्यंतच 251.7 मिलिमीटर पाऊस झाला होता.


दुबार पेरणी...


जून महिन्याच्या सुरवातीला अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळी पेरणी केली. मात्र त्यांनतर मोठा पाऊसच झाला नाही. त्यात उन्हाचे प्रमाण अधिक असल्याने पेरण्या वाया गेल्या. त्यांनतर आता गेल्या तीन दिवसात विभागात बऱ्याच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी केली जात आहे. पण त्यांनतर सुद्धा पुढे पावसाने वेळोवेळी हजेरी लावली तरच पिके जगू शकतील, अन्यथा मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. 


जायकवाडी धरणात 33.94 टक्के पाणीसाठा... 


जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) आज घडीला 33.94 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर जायकवाडी धरण प्रशासनाच्या आकडेवारीनुसार धरणाची पाणी पातळी फुटामध्ये 1507.08 एवढी असून, मीटरमध्ये 459.359 एवढी आहे. तर एकूण पाणीसाठा 1474 .843 दलघमी असून, जिवंत पाणीसाठा 736.737 दलघमी एवढा आहे.तर सद्या पाण्याची आवक 669 क्युसेकने सुरु आहे.