Ravi Rana : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात संकटं वाढली आहेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत. संकटांमधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसा वाचावी असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे. दरम्यान, मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु. आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचे वाचन करु, वेळ असल्यास मुख्यमंत्र्यांनीही आम्हला मोठ्या मनाने साथ द्यावी असेही रवी राणा म्हणाले.


हनुमान चालीसा वाचण्यासाठी महाविकास आघाडीची परवानगी घ्यावी लागते का? असा सवालही रवी राणा यांनी उपस्थित केला. आम्ही अत्यंत श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत. अनेक संकटांना सामना करण्याची आमची तयारी आहे, आम्ही जाणार म्हणजे जाणारच असा निर्धारही राणा यांनी बोलून दाखवला.


दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मला मुंबईत येऊन दाखवण्याचे आव्हान शिवसैनिकांनी दिले होते. दोन-तीन दिवस वाट बघूनही त्यांच्याकडून तारीख आणि वेळ मात्र काही सांगण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांचा हनुमान चालीसाला इतका विरोध का? हे समजायला मार्ग नसल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. आम्ही म्हटल्याप्रमाणे मातोश्रीवर जाऊ आणि हनुमान चालीसा वाचन करु असेही त्या म्हणाल्या. मातोश्रीवर जाण्यासाठी अमरावती पोलिसांनी मला रोखण्याचे कृत्य पुन्हा करु नये. आम्ही शांततेच्या मार्गाने जात आहोत आम्हाला जाऊ देण्यात यावे, असेही राणा म्हणाल्या.


आमदार रवी राणा 23 एप्रिलला 'मातोश्री' निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यांच्यासोबात 600 हून अधिक कार्यकर्ते हे मातोश्रीसमोर जमणार आहेत. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण केलं नाही तर आपण मातोश्रीसमोर जाऊन पठण करु असं आव्हान आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. रवी राणांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष शिगेगा पोहोचण्याची शक्यता आहे.  या आधी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने मातोश्रीसमोर गर्दी केली होती. पण राणा दाम्पत्य काही आले नाहीत. आता आमदार रवी राणांचा मातोश्री समोरील हनुमान चालिसा पठणाचा मुहूर्त ठरला असून 23 एप्रिल रोजी ते मुंबईत येणार आहेत.  


महत्त्वाच्या बातम्या: