कल्याण: राज्य सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून या सरकार मधील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे लोक हे केवळ स्वतःचे कैवारी झाले आहेत, यांना केवळ स्वतःचे धंदे करायचे असल्याची जोरदार टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्थायी समितीच्या अध्यक्षांची प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांना पैसे द्या असंही ते म्हणाले. भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात भव्य शेतकरी मेळाव्याते ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, "भात उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा असेल तर अडीचशे-तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लागत नाहीत. मात्र मुंबई महानगरपालिकेतील एका स्थायी समिती अध्यक्षाने दोन वर्षात जी प्रॉपर्टी कमावली आहे, त्या प्रॉपर्टीची किंमतच 200 ते 300 कोटी पेक्षा जास्त आहे. कोविडच्या एका वर्षाच्या काळात स्थायी समितीच्या अध्यक्षांनी कमावलेल्या 38 प्रॉपर्टी विकल्या तरी देखील भात उत्पादक शेतकऱ्याला बोनस देता येईल."
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या सरकारने चार हजार कोटी रूपयांचा विमा शेतकऱ्यांना दिला. मात्र या सरकारने शेतकऱ्यांकडून फक्त विम्याचे पैसे घेतले. परंतु टेंडर काढताना अशा कंडिशन टाकल्या की केवळ विमा कंपन्यांना त्याचा फायदा होईल. आमच्या काळात विमा शेतकऱ्यांना मिळत होते तरी या लोकांनी विमा कंपन्यांवर मोर्चे काढायला लावले."
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना चार पटीने विम्याचे पैसे मिळत होते. आताच्या सरकारने हे पैसे दोन पटीवर आणून ठेवले आहेत. शेतकऱ्यांना दोन पटीवर आणण्याचं पाप या सरकारने केलं आहे. एमआयडीसीट्आ नावाखाली खाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या जात असून त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली राहीला नाही."
हे सरकार सावकारी पद्धत चालणारे सरकार असून ते सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून वीज रक्कम वसुली करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kolhapur Election : कोल्हापुरातील काँग्रेसचा विजय हा सहानुभूतीच्या लाटेमुळे, 2024 मध्ये ही जागा भाजपचीच: देवेंद्र फडणवीस
- महाविकास आघाडीला बेवड्यांची जास्त चिंता, गरिबांच्या तोंडचा घास काढून घेतला; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप
- तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला