Nitin Gadkari : मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरण, आरोपी जयेश पुजारीवर युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार
Nitin Gadkari : मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयातील धमकीच्या कॉल प्रकरणी युएपीए कायदा लागू होणार आहे.
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयातील धमकीच्या कॉल प्रकरणी युएपीए कायदा लागू होणार आहे. धमकीच्या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर (Jayesh Pujari) विरोधात युएपीए म्हणजेच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे. याबाबतची माहिती एबीपी माझाला नागपूर पोलिसांमधील (Nagpur Police) उच्चपदस्थ विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीर चे संबंध पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळं त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे. जयेश पुजारी उर्फ शाकिरचे संबंध प्रतिबंधित संघटना पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तसेच दाऊद इब्राहीम पर्यंत जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळं याप्रकरणी आधीच नागपुरात दोन गुन्ह्यांची नोंद असताना पोलिसांनी या प्रकरणात युएपीए कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
14 जानेवारी आणि 21 मार्चला केले होते धमकीचे कॉल
दरम्यान, बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीने दिली होती. या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी याने बऱ्याच आधी धर्म परिवर्तन केले असून धर्म परिवर्तनानंतरचे त्याचे नाव शाकीर असल्याची माहिती एबीपी माझा ने समोर आणली होती. तसेच त्याचे काही कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आणले होते.
दाऊद इब्राहिमसह श्रीलंकेतील LTTE सोबतही संपर्क असल्याचे तपासात समोर
दरम्यान, आता एबीपी माझाच्या त्याच बातमीवर शिक्कामोर्तब होत आहे. जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध प्रतिबंधित संघटना पीएफआयशी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. एवढेच नाही तर तो दाऊद इब्राहिम आणि श्रीलंकेतील LTTE सोबतही संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळं या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी उर्फ शाकीर विरोधात यूएपीए कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे ठरवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: