(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नार्वेकरांच्या 'त्या' ट्वीटचं फडणवीसांकडून समर्थन; राणे म्हणाले, नार्वेकर म्हणजे आत्ताचे शिवसेनाप्रमुख का?
Milind Narvekar Tweet : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या बाबरी विध्वंसाची आज आठवण करून दिली आहे.
Milind Narvekar Tweet : आजच्याच दिवशी बाबरी मशीद पाडली होती. त्यासंदर्भात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी एक ट्वीट केलं आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या बाबरी विध्वंसाची आज आठवण करून दिली आहे. अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असं ट्वीट नार्वेकर यांनी केलं आहे. परंतु, या ट्वीटवरुन नारायण राणेंनी चिमटा काढला आहे.
मिलिंद नार्वेकरांनी पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली होती, त्यावेळी शिवसेनेचं योगदान मोठं होतं. त्यावेळी याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीही स्विकारली होती. अशातच त्या घटनेला 29 वर्ष उलटल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून एक इशाराच जणू नार्वेकरांनी दिला आहे. सध्या राम मंदिर निर्माण सुरु आहे, अशातच ही श्रेयवादाची लढाई म्हणावी लागेल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. तर दुसरीकडे भाजपकडून काम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात करण्यात आली आहे. अशातच या प्रकरणातील शिवसेनेचं योगदान विसरुन चालणार नाही, असा सूचक इशारा मिलिंद नार्वेकरांनी दिला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
नार्वेकर म्हणजे, आत्ताचे शिवसेनाप्रमुख का? : नारायण राणे (Narayan Rane)
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातील सिंबायोसिस शिक्षण संस्थेत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आंबेडकरांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अशातच मिलिंद नार्वेकरांनी केलेलं बाबरी विध्वंसाबाबतचं ट्वीट योग्य आहे, असंही ते म्हणाले. परंतु, तेवढ्यात तिथे उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांना थांबवलं आणि "नार्वेकर म्हणजे, आत्ताचे शिवसेनाप्रमुख का?", अशी विचारणा केली. नारायण राणेंच्या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
बाबरी मशीद विद्ध्वंस दिनाला 29 वर्षे पूर्ण
देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना असलेल्या बाबरी मशिदीच्या विद्ध्वंस प्रकरणाला आता 29 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केला होता. या घटनेमुळे देशभर दंगल उसळली होती. त्यात 2000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. राम मंदिराच्या ठिकाणी सोळाव्या शतकात बाबरी मशीद बांधण्यात आली होती असं मत कार सेवकांचं होतं.
उत्तर प्रदेशच्या अयोध्यामधील बाबरी मशिदीची निर्मिती मोगल बादशहा बाबरचा जनरल मीर बाकी यांनी केली होती. अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक दस्तांवेजांनुसार ही मशीद रामाचे जन्म स्थळ असलेल्या मंदिरावर बांधली गेली होती. त्यामुळे ही मशीद कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी जमिनदोस्त केली.