एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकरी संपाला हिंसक वळण, व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या संपाला आज सकाळीच हिंसक वळण लागलं. औरंगाबादमधील जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना काही व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतो आहे.
जाधववाडी मार्केटमध्ये जयाजीराव सूर्यवंशी त्यांच्या सहकाऱ्यांसह बाजार बंद करण्याचं आवाहन करत होते. याचवेळी काही व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचं समजतं आहे.
जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते, त्याच दरम्यान व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जयाजीराव सूर्यवंशीसह ५ शेतकऱ्यांना मारहाण केली.
व्यापाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला तरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो, कांदे फेकत बाजार बंद करण्याचा प्रयत्नही केला.
पहिली ठिणगी साताऱ्यात
दरम्यान शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली. पुणे-बंगळुरु महामार्गावर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. साताऱ्यात शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली. वारणा दूध डेअरीचे हे दोन ट्रक होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ट्रकचालकाला मारहाण केल्याचंही कळतं.
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
दूध-भाजीपाल्याचे ट्रक अडवणारे शेतकरी अटकेत
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर दूध आणि भाजीपाल्याचे गाडी अडवणाऱ्या आठ शेतकऱ्यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे. आंदोलक शेतकरी रस्त्यावर दूध, भाजीपाला फेकत होते. त्यानंतर रात्री तीनच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली आहे. तर राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण करत त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती ठप्प
शेतकरी संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ठप्प झाली आहे. किरकोळ अपवाद वगळता शेतकऱ्यांनी समितीकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. एरव्ही गजबजलेल्या समितीत आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
बळीराजाच्या संपामुळे शहरातील जनता गॅसवर
दुसरीकडे शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शहरातली जनता गॅसवर आहे. शेतकरी संपावर गेल्याने भाजीपाला, दूध कसं मिळणार या प्रश्नामुळे अशा अनेक प्रश्नांमुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे.
काही व्यापाऱ्यांकडून लूट
तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी घोषित केलेल्या संपाचा काही संधीसाधू व्यापाऱ्यांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. अचानक भाज्यांचे भाव वाढवून व्यापाऱ्यांनी सामान्यांची लूट सुरु केली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.
त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता 1 जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.
संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी
- शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा
- शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement