एक्स्प्लोर
'मकोका'तील आरोपी भाजपचा आदिवासी आघाडीचा अध्यक्ष
ज्या विनोद मसरामला शहर भाजपच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, तो मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी राहिला आहे.

नागपूर : भाजप आणि गुन्हेगारांचे जवळचे नाते हे नागपुरात जणू समीकरणच होऊन बसले आहे. भाजपच्या मंचावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांची उपस्थिती अनेकदा नागपूरकरांनी पाहिली आहे. मात्र, आता पार्टी विथ डिफ्रंसचा दावा करणाऱ्या भाजपने गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पक्षात महत्वाचे पद देणेही सुरू केले आहे. भाजप शहर अध्यक्ष आणि विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी विनोद मसराम या भाजप कार्यकर्त्याची भाजप शहराच्या आदिवासी आघाडीचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. विनोद मसरामला अध्यक्षपद बहाल करताना विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्यासह पक्षाचे अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. ज्या विनोद मसरामला शहर भाजपच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, तो मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी राहिला आहे. सोनेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक घर बळकावण्याच्या आरोपाखाली 2016 मध्ये नागपूर पोलिसांनी नागपूर शहरातील कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर, युवराज माथनकर या सराईत गुंडासह आठ जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये भाजपने पद बहाल केलेला विनोद मसराम हाही मकोकाचा आरोपी झाला होता. एबीपी माझाने भाजपमध्ये गुन्हेगारांना पद देण्यासंदर्भात नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आणि आमदार सुधाकर कोहळे यांना विचारणा केली. विनोद मसरामच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल कोणतीच माहिती नव्हती. आता आम्ही त्याच्या पार्श्वभूमीची माहिती घेऊ आणि पुढील निर्णय घेऊ, असं हास्यास्पद उत्तर सुधाकर कोहळे यांनी दिले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















