(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बंगला न बघताच दादा निघून गेला, शहीद संग्राम पाटील यांच्या भावानं फोडला हंबरडा
निवृत्तीनंतर गावात आपला एक छोटासा बंगला असावा असं स्वप्न संग्राम यांनी पाहिलं होतं. मात्र, संग्राम यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलंय. संग्राम यांच्या मागे आई-वडिल, भाऊ-बहिण, पत्नी आणि दोन चिमुकली मुलं आहेत. यात मोठा मुलगा 8 वर्षांचा आहे तर मुलगी 3 वर्षांची आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील आणखी एका जवानाला सीमेवर देशाचं रक्षण करत असताना वीरमरण आलं. संग्राम शिवाजी पाटील असं शहिद झालेल्या जवानाचं नाव आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा या मूळगावी संग्राम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या वेळी सीमेवर आमच्या अजून किती जवानांचं रक्त सांडायचं असा सवाल करण्यात आला. संग्राम हे 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे जवान होते. येत्या मे महिन्यात ते निवृत्त होणार होते. निवृत्तीनंतर गावात आपला एक छोटासा बंगला असावा असं स्वप्न संग्राम यांनी पाहिलं होतं. मात्र, संग्राम यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलंय. संग्राम यांच्या मागे आई-वडिल, भाऊ-बहिण, पत्नी आणि दोन चिमुकली मुलं आहेत. यात मोठा मुलगा 8 वर्षांचा आहे तर मुलगी 3 वर्षांची आहे.
खूप गरीबीतून आई-वडिलांनी संग्राम यांना मोठं केलं. मात्र, चांगले दिवस येत असतानाच त्यांच्यावर काळानं घाला घातला. याआधी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आलं. त्यानंतर लगेच संग्राम हे देखील देशासाठी शहीद झाले. त्यामुळं पाकिस्तानचा एकदाच निकाल लावून टाकावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी शहिद संग्राम पाटील अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
भावाला ओवाळण्याऐवजी अखेरचा निरोप देण्याची वेळ, शहीद ऋषिकेश जोंधळेंवर कोल्हापुरात अंत्यसंस्कार
बंगल्याचं स्वप्न अर्थवट ठेवून दादा गेला : संदीप पाटील
गेल्या बुधवारीचं संग्राम यांचा भाऊ संदीप यांना फोन आला होता. घराच्या बांधकामाचं कसं काय चाललं आहे? कोण-कोणती कामं अजून बाकी आहेत? शेतातील कामाचं काय झालं? अशी सगळी चौकशी संदीप यांच्याकडे केली होती. इतकंच नाही तर मी सुट्टीला आल्यानंतर राहिलेलं कामं करु. इतर पै पाहुण्यांकडे जाता येईल असं बोलणं संदीप यांच्यासोबत झालं होतं. मात्र, घराचं स्वप्न पूर्ण न होताच दादा गेला असं सांगून संदीप यांनी हंबरडा फोडला.
दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटीची मदत : सतेज पाटील
राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटीची मदत जाहीर केली आहे. आज कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली. येत्या एक ते दोन महिन्यात सगळी कागदपत्र पूर्ण करुन ही मदत दिली जाणार आहे. यामध्ये वीरपत्नी यांना 60 टक्के, वीरमाता यांना 20 टक्के आणि वीर पती यांना 20 टक्के अशी विभागणी केली जाणार असल्याचं देखील सतेज पाटील यांनी सांगितलं.
Martyr Sangram Patil | कोल्हापूरचे वीरपुत्र शहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार