Marathwada Water Shortage : जून महिन्यात पावसाला (Rain) सुरवात होणे अपेक्षित असते. मात्र यंदा जून महिना कोरडा गेला आहे. त्यानंतर जुलै महिना अर्धा संपत आला असताना किरकोळ पाऊस वगळता मराठवाड्यात (Marathwada) अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विभागात अद्यापही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. मान्सूनच्या आगमनानंतर काही महसूली मंडळांमध्ये थोडाफार पाऊस झाला असून, त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली आहे. मराठवाडा विभागातील 467 मंडळांपैकी तब्बल 416 मंडळांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे या मंडळांमध्ये संकट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेत आहे. 


राज्यात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे जून महिन्यात तसेच जूनपूर्वी होणारा पाऊस झालाच नाही. संपूर्ण जून महिन्यामध्ये सरासरी केवळ सात दिवस पाऊस झाला. जुलै महिन्यात पावसाची अपेक्षा असताना अर्धा महिना संपत आला पण दमदार पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 25, जालना 5, बीड 8, लातूर 9, तर नांदेड जिल्ह्यातील केवळ 4 महसुली मंडळांनी अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकाही मंडळामध्ये आवश्यक असलेला पाऊस झालेला नाही.


विभागातील परिस्थिती...



  • जून आणि जुलै महिन्याच्या दोन्ही आठवड्यांमध्ये मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाही.

  • इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात मात्र चांगला पाऊस झाला आहे.

  • औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 76.7 टक्के पाऊस झाला आहे.

  • जालना जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 65 टक्के पाऊस झाला आहे.

  • बीड जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 65.5टक्के पाऊस झाला आहे.

  • लातूरमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 43.4 टक्के पाऊस झाला आहे.

  • धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 65.5टक्के पाऊस झाला आहे.

  • नांदेडमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 51.8 टक्के पाऊस झाला आहे.

  • परभणी जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 45.6 टक्के पाऊस झाला आहे.

  • हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 43.1 टक्के पाऊस झाला आहे.


शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा 


विभागातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टीही झाली. त्यामुळे खरीप पेरण्यांचा आकडाही वाढला. जुलै महिन्यात एखाद्या मोठ्या पावसाच्या भरवशावर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, त्यानंतर मात्र पावसाचा केवळ शिडकावाच सुरू असून शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकल्प कोरडेठाक पडली आहे. त्यातच मराठवाड्याची तहान भाग्वणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठी 27 टक्के शिल्लक राहिला असल्याने, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! जायकवाडी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव; मराठवाड्यातील प्रमुख धरणात 33.48 टक्केच पाणीसाठा शिल्लक